Prahar’s agitation for teachers’ demands : शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या दालनात आंदोलनाचा इशार
Amravati राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गुरुकुंज मोझरी येथे रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर प्रहार संघटनेच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागातर्फे घेतलेल्या संचमान्यतेच्या शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध करत शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची जोरदार मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी संख्या आणि शिक्षकांच्या बदली संदर्भातील नवीन अटी-शर्तींमुळे शाळांवर टाळे लागण्याची वेळ येत आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला. त्यामुळे हा जीआर तत्काळ रद्द करावा, अन्यथा शिक्षणमंत्र्यांच्या दालनातच आंदोलन करू, असा थेट इशारा बच्चू कडूंनी दिला.
बच्चू कडू म्हणाले, “शालेय शिक्षण विभागाने घेतलेला संचमान्यतेचा निर्णय ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारावर गदा आणणारा आहे. शिक्षण हक्क कायद्याला विरोध करणारा हा निर्णय आहे. हा जीआर रद्द झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सरकारला जागं करण्यासाठी आंदोलनाची दिशा आणखी तीव्र केली जाईल.”
या आंदोलनात प्रहारचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, नेते संजय देशमुख, महेश बडे, जितू दुधाने, जय बेलखेडे, मंगेश देशमुख, प्रदीप बंड, योगेश लोखंडे, अंकुश गायकवाड, संतोष किटुकले, राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Election Commission : ओबीसी उमेदवाराला निवडणूक खर्चाच्या १० पट मोबदला द्यावा
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुरुकुंज मोझरी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत शिस्तबद्ध पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवला.