Tractor Morcha in Amravati for farmer’s demands : शेतकऱ्यांसाठी अमरावतीत २१ मे रोजी ट्रॅक्टर मोर्चा
Amravati निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने सरकारने पाळलेली नाहीत. शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, या आरोपांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. त्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी काँग्रेस २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे.
राज्य शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह अनेक आश्वासने दिली होती. मात्र, आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्षच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, २१ मे रोजी सकाळी १० वाजता जयस्तंभ चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतमालाला भाव नाही, नापिकीसाठी नुकसानभरपाई अद्याप दिलेली नाही, कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही, या सर्व मुद्द्यांवरून काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी म्हटले की, “निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना गाजर दाखवले, पण सत्तेत आल्यावर त्यांचे कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे आता काँग्रेस शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरत आहे.”
या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर आणि प्रा. वीरेंद्र जगताप करणार आहेत. या आंदोलनात शेतकऱ्यांसह काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
देशमुख म्हणाले, “पीकविमा योजना फसव्या ठरल्या आहेत, विमा कंपन्या नुकसानभरपाईसाठी चालढकल करतात. शासनाच्या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आम्ही शांततापूर्ण मार्गाने शेतकऱ्यांचे प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देणार आहोत.”
Ashish Jaiswal, D. M. Reddy : आशिष जयस्वालांपुढे पुन्हा रेड्डींचे आव्हान!
ठाकरे गटाने अलीकडेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आंदोलन केले. आता काँग्रेसनेही मोर्चा जाहीर केल्याने विरोधकांकडून शासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर २१ मेचा काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे.