Criminal cases will be registered if linking is found in Seed and fertilizer sales : मुख्यमंत्र्यांचा इशारा, पालकमंत्री म्हणततात, ‘शेतकऱ्यांची फसवणूक होऊ देणार नाही’
Akola बी-बियाणे आणि खत विक्री दरम्यान कृषी केंद्रांवर लिंकिंगचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत स्पष्ट इशारा दिला आहे की, “निविष्ठांच्या विक्रीत लिंकिंग आढळल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.”
या प्रकरणी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली होती. बी-बियाणे आणि खते यांची स्वतंत्र विक्री होत नसून, कृषी केंद्रांवर लिंकिंगद्वारे शेतकऱ्यांवर बळजबरी होत असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून मिळत होत्या.
पालकमंत्री फुंडकर यांनी दिनांक १७ मे रोजी झालेल्या जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठकीत खरीप नियोजन, निविष्ठा उपलब्धता व वितरणासंबंधी मुद्दे मांडले. या अनुषंगाने त्यांनी निविष्ठा उपलब्धतेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन सादर केले. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांनी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा करण्याचे निर्देश राज्यस्तरीय बैठकीत दिले.
Nagpur Municipal Corporation : महापालिका म्हणते नागपुरात एवढे खड्डे, लोक म्हणतात कमीच सांगितले!
या खरीप हंगामात सोयाबीन आणि कपाशीच्या पेरणीमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, ‘अजित-१५५’ जातीच्या किमान ३ लाख बियाण्याची पाकिटे आणि ‘अजित-५’ जातीची ५० हजार पाकिटे उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली आहे.
कपाशीचा पेरा वाढण्याच्या पार्श्वभूमीवर, अकोला जिल्ह्यासाठी २५ हजार मेट्रिक टन डीएपी खताचे आवंटन मंजूर करून कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) यांच्याकडून त्वरित पुरवठा व्हावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
याशिवाय, मृग बहार २०२४ अंतर्गत अकोट तालुक्यातील उमरा मंडळात हवामान केंद्राच्या पर्जन्यमापक यंत्रात २ ते ५ जुलै २०२४ या कालावधीत छेडछाड झाल्याचे निदर्शनास आल्याने, त्या कालावधीसाठी दुसऱ्या जवळच्या केंद्राचा डेटा घेऊन शेतकऱ्यांना फळपिक विमा योजनेचा लाभ मिळावा, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी केली आहे.
“शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ देणार नाही. निविष्ठांचा सुरळीत व पारदर्शक पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल,” असे निर्देश कृषी यंत्रणेला देण्यात आल्याचे पालकमंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले.