Acquired land 50 years ago, still no compensation : शेतकऱ्यांच्या संयमाचा बघितला अंत; आता कालवाच बुजवणार
Salekasa या देशात जेवढी सरकारं स्थापन झाली, त्या प्रत्येकाने ‘न्याय देणारं सरकार’ अशी स्वतःची ओळख सांगितली. पण प्रत्यक्षात तसं चित्र कधीच बघायला मिळालं नाही. विशेषतः शेतकरी वर्ग कायम न्यायाच्याच प्रतिक्षेत राहिला. जगाच्या पोशिंद्याला स्वतःचं पोट भरण्यासाठी मात्र कायम संघर्षच करावा लागतो. याची प्रचिती देणारी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सालेकसा येथे एका प्रकल्पासाठी ५० वर्षांपूर्वी जमीन संपादित करण्यात आली. मात्र अद्याप प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही.
पिपरीया परिसरात १९८५ ते १९९१ या काळात लघु पाटबंधारे विभागाने आमानारा तलावाचे बांधकाम पूर्ण केले. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कालवा तयार केला. कालव्यासाठी ज्या शेतकऱ्यांची शेतमीन संपादित केली, त्यांना जमिनीचा मोबदला देणे अनिवार्य होते. पण काम पूर्ण होऊन ५० वर्षे लोटली तरी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही.
Transgender Security : तृतीयपंथियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोबदल्याची वाट पाहताना शेतकऱ्यांची एक पिढी संपून गेली. दुसरी पिढी मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहे. ही प्रतीक्षा कधी संपणार, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत. तसेच पंधरा दिवसांत जमिनीचा मोबदला मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण त्यांच्या वारसदारांना कुठलाही मोबदला मिळालेला नाही. उलट जमीन न राहता संपादित झाल्यामुळे ते भूमिहीन व अत्यल्पभूधारक झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर मोलमजुरी करून जीवन जगण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात वारंवार संबंधित विभाग व शासनाकडे पत्रव्यवहार केला. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शासनाने आम्हाला जर संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला पंधरा दिवसांत दिला नाही तर आमच्या शेतातून कालवा बुजवण्याची तयारी करू. असा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.