Health examination of common people by central government : २२ हजार लोकांपर्यंत पोहोचले ‘प्रकृती परीक्षण’
Wardha केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाकडून देशभर प्रकृती परीक्षण अभियानाचा पहिला टप्पा २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान राबविण्यात आला. यात आरोग्याच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. रोज व्यायाम करता का, मसालेदार पदार्थ खाता का, सिगारेट ओढता का, थोडं चालल्यावर दम लागतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने लोकांकडून जाणून घेतली आहेत.
अभियानांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील १८ ते ७० वर्षे वयोगटातील नागरिकांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले. यामध्ये वर्धा जिल्ह्यात २२ हजार ६६८ जणांचे प्रकृती परीक्षण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुर्वेद महाविद्यालय व आरोग्य वर्धिनी केंद्रातील अधिकाऱ्यांना प्रकृती परीक्षण अभियानात सहभागी होते. या अभियानकरिता बीएएमएस, वैद्यकीय अधिकारी, सब सेंटर, आरबीएसके, आयुष्यविंग यांनी प्रयत्न केले.
२५ नोव्हेंबर ते २५ डिसेंबरदरम्यान आयुर्वेद अर्हताधारक प्राध्यापक, विद्यार्थी, खासगी व्यावसायिक व शासन सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत १८ ते ७० वर्षे वयोगटातील लोकांचे प्रकृती परीक्षण केले. प्रकृती परीक्षण करण्यासाठी आयुष मंत्रालयाने विशेष ॲप तयार केले आहे. या एकच ॲपवर सामान्य नागरिक व आयुर्वेद डॉक्टरांना लॉगिन करण्याची सोय देण्यात आली आहे.
आयुर्वेद डॉक्टरांना प्रकृती परीक्षण करण्यासाठी एम.सी.आय.एम. कॉन्सिलचा नोंदणी क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. केवळ आयुर्वेद डॉक्टरांनाच प्रकृती परीक्षण करता येते. सामान्य नागरिकांनी प्रकृती परीक्षण ॲपवर स्वतःचे नाव, वय व पूर्वीचे आजार अशी माहिती भरल्यानंतर ‘क्यूआर कोड’ तयार होतो. या कोडला आयुर्वेद डॉक्टरांद्वारे स्कॅन करून २२ मुद्द्यांच्या आधारे नागरिकांची शारीरिक तपासणी व प्रश्न विचारून प्रकृती परीक्षण केले जाते.
प्रकृती परीक्षणाच्या आधारावर अभ्यास केला जाणार आहे. यात जेनेटिक पॅटर्न काय आहे, याचे विश्लेषण केले जाणार आहे. याशिवाय, मोबाइल ॲपच्या मदतीने संबंधित व्यक्तीला बदलत्या ऋतूनुसार घ्यावयाच्या काळजीचे मॅसेजही मिळणार आहे.