Badgujars entry in BJP created many unanswered questions : बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाने निर्माण केले अनेक अनुत्तरीत प्रश्न
अलीकडच्या काळात गंभीर आरोपावरून चर्चेत आलेले नाशिकचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नाट्यमय भाजप प्रवेश अखेर पार पडला. राज्याचा राजकारणातला हा सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. यासंदर्भात घडलेल्या सगळ्या घटनांनी शिस्तबद्ध असलेल्या बलाढ्य भाजपमध्ये काही विषयात चांगलाच ‘गोंधळ’ असल्याचे समोर आले. भाजपचा एक मोठा नेता याला ‘ मिस कम्युनिकेशन’ म्हणत काहीतरी गडबड आहे हे मान्य करतो. खरंच तसे असेल की, भाजपमध्ये अंतर्गत वर्चस्वाचा नवा ‘ डाव ‘ या निमित्ताने मांडला जात आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुधाकर बडगुजर यांची कारकीर्द, त्यांच्यावर असलेले गंभीर आरोप, भाजप विरोधात लढताना त्यांनी केलेली गुंडागर्दी. याचा संदर्भ घेत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेशाला केलेला प्रचंड विरोध. प्रवेश स्थगित केल्याचे सांगत अचानक बडगुजर शक्ती प्रदर्शन करत, मुंबईत जाऊन एका विशेष सोहळ्यात कार्यकर्ते पदाधिकारी एका माजी मंत्रासह भाजपमध्ये दाखल झाले. हा या घटनेमागचा थोडक्यात तपशील. इतर पक्षातून भाजपमध्ये होणारे ‘इनकमिंग’ हे नवीन नाही पण या प्रवेश सोहळ्या इतकी चर्चा दुसऱ्या कोणाच्या प्रवेशाची झाली नाही.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी ठणकावले, पण प्रशासनाला फरक पडतो का?
बडगुजर यांना राज्यस्तरीय ओळख मिळाली ती एका वेगळ्या प्रकरणामुळे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परदेशातील कॅसिनोत बसलेला एक फोटो माध्यमांना दाखवत गंभीर आरोप केले. हा राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला. दरम्यान बावनकुळे यांचे हे फोटो या बडगुजरांनी व्हायरल केल्याचा आरोप झाला. आणि ते भाजपच्या निशान्यावर आले. काही दिवसातच मंत्री निलेश राणेंनी या बडगुजरांवर अत्यंत गंभीर प्रकारच्या आरोप केले. देशाचा दुश्मन असलेल्या दाऊद इब्राहिम चा हस्तक सलीम कुत्ता याच्या पार्टीत हेच बडगुजर सहभागी झाले आणि तेथे त्यांनी डान्स केल्याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत राणेंनी रान उठवले विधानसभेतही हा प्रश्न गाजला.
या प्रकरणाने समोर आलेले बडगुजर मग वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या चौकशीसाठी रडारवर आले. त्यांना अटक ही झाली, शिवसेना ठाकरे गटाने तेव्हा बडगुजरांची चांगलीच पाठराखण केली होती. काही दिवस जाताच बडगुजर यांनी भाजपची जवळीक साधायला सुरुवात केली, भाजपचे संकट मोचक आणि उत्तर महाराष्ट्राचे प्रभावी नेते गिरीश महाजन दरवेळी पक्ष विस्तारासाठी कार्यरत असतात. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप विस्तारात त्यांनी, मागे लागलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर केला. भाजपमधील वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरही हा निर्णय कोणालाही पटलेला नव्हता.
भाजपमधील अनेकांना बडगुजर नको होते. पण पक्ष विस्ताराच्या नावाखाली या प्रवेशासाठी जो खेळ मांडला गेला, यातूनच शिस्तबद्ध भाजप मधला सावळा गोंधळ जगासमोर आला. प्रदेशाध्यक्षांवर झालेल्या आरोपात बडगुजर यांच्यावर असलेला संशय. स्थानिकांना डावलून पक्षप्रवेशासाठी घातलेला घाट. महत्त्वाच्या पदावर असलेल्या प्रदेशातील शीर्ष नेत्यांना प्रवेश सोहळ्या बाबत नसलेली माहिती. पक्ष शिस्तीत वाढलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या निर्णयावर घेतलेली उघड भूमिका. त्यामागे असलेले अदृश्य आत. या प्रवेशाने नेमका कोणाला आणि काय फायदा होणार? पक्षाची प्रतिमा जपली जाणार का? परंपरागत मतदार हे स्वीकारणार का? असे अनेक अनुत्तरीत प्रश्न हा एक प्रवेश सोहळा निर्माण करून गेला आहे
Nagpur Municipal Corporation Election : नव्या प्रभागरचनेमुळे वाढली इच्छुकांची धाकधुक!
भाजपाची विस्ताराची नीती नवीन नाही. यात महाजनांनी तर आता शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यामध्ये माणूसच शिल्लक न राहू देण्याचा विडा उचलला आहे. तसे वक्तव्यही ते कायम करत आहेत. राजकीय पटलावर पक्ष विस्तार आणि सत्ता बळकटीकरण हे मुख्य धोरण असलेच पाहिजे. पण सत्तेच्या हव्यासासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती कितपत ठीक आहे? हा मुद्दा सामान्य लोक उपस्थित करतात. सामान्यांचा राजकारणावरील विश्वासही याच खेळीमुळे उध्वस्त झाला आहे. तेव्हा एखाद्या प्रकरणात अशी आगतिकता का? असा प्रश्न सामान्यांही पडतो. जो या प्रकरणातही आहे. प्रदेशाध्यक्ष, भावी प्रदेशाध्यक्ष, आणि प्रमुख पदाधिकारी नेते यांना डावलून प्रवेश सोहळ्याची नियोजन होते. ऐनवेळी मग हे ‘ मिस कम्युनिकेशन’ होते असे सांगण्यात येते. ते खरेच तसे होते की भाजपमधील अंतर्गत राजकारणातील नवे डाव मांडले गेले आहेत? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.