Expenditure incurred for a non-existent drain : बाजार समिती प्रशासकाला कुणाचं पाठबळ?; चौकशी समिती नेमली
Amravati अचलपूर बाजार समितीवर प्रशासकीय राज असताना भ्रष्टाचाराचा कळस गाठण्यात आला आहे. अस्तित्वात नसलेल्या नाल्यावर साडेचार लाख रुपयांचा खर्च दाखवण्यात आला. असे भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे प्रशासकाने केले. त्याची आता चौकशीही होणार आहे. पण या प्रकाराला राजकीय वास येत आहे. त्यामुळे प्रशासकाला कुणाचं पाठबळ आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
अचलपूर बाजार समितीवर कार्यकारणी अस्तित्वात नसताना २०२२-२३ या कालावधीत प्रशासकाचे राज्य होते. या कालावधीत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. पथ्रोट उपबाजारात नाला अस्तित्वात नाही. तरीही नाला दाखवून ४ लक्ष ५० हजार रुपये काढण्यात आले आहेत. नाल्याचे काम केल्याचे यामध्ये दाखविण्यात आले आहे. यावरून भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, याची कल्पना येते.
यावर कळस म्हणजे एका दुर्लक्षित कार्यालयाच्या डागडुजीच्या नावावरही पैसे काढण्यात आले आहेत. पथ्रोट येथील कार्यालय दुर्लक्षित आहे. या ठिकाणी कुठलेच कार्यालयीन काम होत नाही. तरीसुद्धा या कार्यालयाच्या डागडुजीसाठी २ लाख ५० हजार रुपये काढण्यात आले आहेत. दुसरीकडे बाजार समितीच्या अतिक्रमित जागेच्या नावावरीही तब्बल सात लाख रुपये काढल्याचे उघडकीस आले आहे. असदपूर येथील जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अशा अतिक्रमित जागेवर सपाटीकरण केल्याचे दाखवले. आणि ७ लाख रुपयांचे देयक काढण्यात आले.
Nagpur Police : व्वा रे हिंमत..! तोतया पोलिसांनी ठाण्यासमोरच वृद्ध दाम्पत्याला लुटले !
बाजार समितीची धामणगाव गढी या गावातसुद्धा जागा आहे. या जागेमध्ये एक टीनशेड आहे. टिनाचे शेड उडाल्याचे दाखवण्यात आले. त्या ठिकाणी टीनाचे पत्रे लावल्याचे दाखवून लाखो रुपये काढण्यात आले आहेत. प्रशासकाच्या राजवटीत अशा अनेक प्रकारच्या बाबी लेखापरीक्षणात पुढे येत आहेत. प्रशासक आणि त्यांच्या ‘जबाबदार’ कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार केला. कारभार करूनही बाजार समितीचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान करण्यात आल्याचे समोर आले आहे.
कुणाचीही हयगय केली जाणार नाही
बाजारसमितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांनी सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडली पाहिजे. जर कोणी कर्मचारी लाचलुचपत करताना आढळून आला, तर अशा कर्मचाऱ्यांची कदापिही हयगय केली जाणार नाही. अशा दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी सांगितले.
चौकशी समिती नेमली
कार्यालयाला तक्रार प्राप्त झाली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अचलपूर कार्यालयाचे सहायक निबंध यांना पत्र देण्यात आले आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करू, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.








