Congress leader aggressively reacts on BJP leader Babanrao Lonikar’s statement : शेतकऱ्यांच्या योजना भाजप स्वतःच्या खिशातून पैसे काढून राबवतात का?, वडेट्टीवारांचा सवाल
Nagpur : आधी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आता भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांचा घोर अपमान केला आहे. ‘शेतकऱ्यांचे कपडे, चपला, मोबाईल आमच्या पैशांतून चालतात’, असे भाजपचा नेता बोलतो. हा उद्धटपणा आणि ही भाषा म्हणजे सत्तेची आलेली मस्ती आहे. यातून भाजपचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय आहे, हे स्पष्ट होते, असे म्हणत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार लोणीकरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.
शेतकऱ्यांबद्दल बोलताना बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली अन् त्यांनी शेतकऱ्यांसंदर्भात नको ते वादग्रस्त वक्तव्य केले. एका गावात कुणालातरी उद्देशून बोलताना ते म्हणाले, ‘तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. तुझ्या आईला, बहिणीला, बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. तुमच्या अंगावरचे कपडे, बूट, चपला आम्हीच दिल्या. ते कट्ट्यावर बसलेले पाच – सहा कारटे. त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला.’ या वक्तव्यावरून राज्यभरातील शेतकरी आणि लाडक्या बहीणींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Akash Fundkar : बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्यांना बसणार दणका
लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी X वर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, ‘माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेले वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांना महाराष्ट्राने जागा दाखवायलाच हवी. भाजपने स्वतःच्या खिशातून पैसे काढून सरकारी योजना या दिल्यागत सांगणं, ही महाराष्ट्रातील जनतेची थट्टा आहे. हे पैसे जनतेचे आहेत. त्यात महायुतीच्या मंत्र्यांचं कर्तृत्व म्हणजे धनादेश वाटताना फोटो काढून घेणं. सत्ताधाऱ्यांनो लक्षात ठेवा तुम्ही आज सत्तेत आहात ते शेतकरी आणि जनतेच्या मतांमुळे आणि तोच शेतकरी गरज पडल्यास तुमचं मुल्यही शून्यावर आणू शकतो.’