Breaking

Eknath Shinde : शिंदेसेनेत गुंडाचा प्रवेश; चुकून प्रकार घडल्याचा दावा

Gangster joins Shiv Sena : गुंड युवराज माथनकरच्या शिंदेसेनेतील प्रवेशाने खळबळ

Nagpur आधीच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना धडपडत आहे. अश्यात एका कुख्यात गुंडाने शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. यावर जिल्हाध्यक्षांनी मात्र गर्दीमध्ये चुकून प्रकार घडला असावा, असा दावा केला आहे.

नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश घेतला. नागपूरचा कुख्यात गुंड व गॅंगस्टर संतोष आंबेकर याचा एकेकाळचा साथीदार युवराज माथनकर यानेदेखील शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. तसा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विरोधकांच्या हाती आयतेच कोलित सापडले आहे. दुसरीकडे पक्षाने मात्र गर्दीत चुकीने प्रवेश झाला असावा असा दावा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. युवराज माथनकर हा नागपूरमध्ये सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खंडणी, खून अशा गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. २०१६ मध्ये नागपूरमधील एका प्रसिद्ध बिल्डरला धमकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली होती. इतकेच नव्हे, तर त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करण्यात आला होता.
युवराज माथनकर हा कुख्यात गँगस्टर संतोष आंबेकर याचा सहकारी होता, मात्र नंतर त्यांच्यात मतभेद झाले. त्यानंतर युवराज माथनकर याने स्वतःची गॅंग सुरू केल्याचे पुढे आले होते. १२ वर्षांपूर्वी युवराज माथनकर याने एका युवकाची हत्या केली होती. त्या प्रकरणाचा न्यायालयीन तपास सध्या सुरू आहे. अवैध कामांच्या जोरावर युवराजने अतिशय कमी वेळेत कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळवली.

CM Devendra Fadnavis : महास्ट्राईडमधून राज्याच्या विकासाला मिळेल दिशा

नागपुरात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा प्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश घेणाऱ्यांच्या गर्दीत युवराज माथनकर देखील होता. माथनकरचा हा प्रवेश सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सर्वांच्या नजरेत आला. या व्हिडिओत माथनकर थेट उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन शिवसेनेचे भगवे उपरणे स्वीकारताना दिसत आहे. मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याने प्रवेश घेतल्याचे फेटाळले आहे.

प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत त्याचे नाव नव्हते, असे म्हटले आहे. विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. युवराज माथनकर नावाच्या व्यक्तीचा पक्षप्रवेश आम्हाला प्रसारमाध्यमांकडूनच मिळाली. आम्हाला कार्यक्रमाच्या वेळी कुठलीच माहिती नव्हती. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यात येते व चांगले चारित्र्य असलेल्या कार्यकर्त्यांनाच प्रवेश देण्यात येतो. त्यात युवराजचे नाव नव्हते.

Zilla Parishad School : ४५० शाळांमधील CCTV च्या प्रस्तावाचे काय झाले?

कार्यक्रमाच्या गर्दीत अनेक जण उपमुख्यमंत्र्यांची केवळ निवेदन देण्यासाठी आले होते. माथनकर बहुदा त्याच गर्दीत असावा. त्या गर्दीत त्याचा चुकून प्रवेश झाला असावा, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांनी मांडली.