Chikhali Congress protest with ‘Jode Maro’ : काँग्रेसकडून चिखली येथे आंदोलन, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
Buldhana “शेतकऱ्यांच्या अंगावरील कपडे, चप्पल आणि महिलांना मिळणारा पगार हा सरकारचा आहे,” असे वक्तव्य करून भाजपचे माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी संपूर्ण शेतकरी वर्ग आणि राज्यातील महिलांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या निषेधार्थ चिखली येथे तालुका काँग्रेसच्या वतीने ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात काँग्रेसने लोणीकर यांच्या वक्तव्याला जनतेच्या कराच्या माध्यमातून आलेल्या सत्तेचा अहंकार असे संबोधले. यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “जर भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये अशीच सुरू राहिली, तर जनता त्यांना शब्दशः जोडे मारल्याशिवाय राहणार नाही.”
Eknath Shinde : शिंदेंची ‘ऊर्जा’ कुणासाठी धोक्याची? नव्या संघटनेमुळे अस्वस्थता!
राहुल बोंद्रे म्हणाले, “शेतकरी हा केवळ अन्नदाता नाही तर राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक रचनेचा खरा आधारस्तंभ आहे. अशा घटकांचा आणि महिलांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “नेतेगिरी, पद, वाहन, डिझेलपासून ते विमानाच्या तिकीटांपर्यंत सत्ताधाऱ्यांचा प्रत्येक खर्च हा जनतेच्या करातून चालतो. त्यामुळे लोणीकर यांनी केलेली वक्तव्ये ही लोकशाही आणि जनतेचा थेट अपमान आहे.”
आंदोलनानंतर तहसीलदार मार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. यामध्ये लोणीकर यांच्यावर सखोल चौकशी करून आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. तसेच भविष्यात कोणीही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेविषयी अपमानास्पद भाषा वापरणार नाही, यासाठी कठोर कायदा करण्याची मागणीही करण्यात आली. अन्यथा चिखली काँग्रेसकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Nagpur Municipal corporation election : जनसंपर्कात पैसा खर्च होत आहे, पण निवडणुकीचा पत्ता नाही!
या आंदोलनात राहुल बोंद्रे यांच्यासह नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी अध्यक्ष अतहरोद्दीन काझी, डॉ. मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, सचिन बोंद्रे, प्रा. राजू गवई, युवक काँग्रेसचे विकास लहाने, रज्जाक शेख, डॉ. सत्येंद्र भुसारी, सरपंच, स्थानिक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.