RSS-led BJP is creating bitterness against Mahatma Gandhi : नाथुराम गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न
Nagpur : पुणे स्टेशन परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला शुक्ला आडनाव असलेल्या एका माथेफिरू व्यक्तीने कोयत्याने तोडफोड करण्याचा प्रयत्न करून पुतळ्याची विटंबना केली आहे. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार) कठोर शब्दात निषेध केला आहे. जेव्हापासून देशात RSS प्रणित भाजपाचे सरकार आले तेव्हापासून महात्मा गांधी यांच्या बद्दल पध्दतशीर कटुता तयार होईल, असे वातावरण तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात कुंटे पाटील म्हणाले, वारंवार अशा घडवून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा जो जाणीवपूर्वक प्रयत्न या देशात सुरू आहे, त्याचाच हा परिणाम आहे. आता या आरोपीला माथेफिरू वेडा ठरवून पुन्हा मोकळा करण्याचे प्रयत्न हे सरकार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. महात्मा गांधी हे या देशाचे महान नेते आहेत. विविध लिखाणातून व संगोष्टीमधून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरवून कारागृहात पाठवण्यात आले पाहिजे.
महात्मा गांधी हे केवळ स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे नेते नाहीत, तर ते भारताच्या नैतिक अधिष्ठानाचे शिल्पकार आहेत. पण संविधान न माननारे कट्टरवादी विचारांचे काही लोक आणि संघटना महात्मा गांधींचा द्वेश करतात. याच द्वेषातून महात्मा गांधींची हत्या करण्यात आली होती. २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले आणि तेव्हापासूनच अशा माथेफिरूंना मोकळीक मिळायला लागली आहे. त्यामुळेच सुरज शुक्लासारखे विखारी लोक तयार झाले आहेत. या प्रवृत्तीचा वेळीच बंदोबस्त करणे अत्यावश्यक आहे, असेही कुंटे पाटील यांनी म्हटले आहे.