If the drains were cleaned, how did rainwater enter people’s homes? : पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर गडकरी संतापले, स्पॉटनिहाय अहवाल मागवला
Nagpur बुधवार, दि. 9 जुलैला नागपुरात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नागपूरकरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच स्पॉटनिहाय अभ्यास करून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
सदर येथील नियोजन भवन येथे गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मीणा आदींची उपस्थिती होती.
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व मालवाहिन्यांची सफाई झाली होती, तर ही परिस्थिती का उद्भवली, असा सवाल गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विचारला. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बेसा-बेलतरोडी, मनीष नगर भागात उद्भवलेल्या परिस्थितीवरही गडकरींनी नाराजी व्यक्त केली. बेसा-बेलतरोडी भागात अनधिकृत बांधकामामुळे देखील पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये शिरल्याची बाब निदर्शनास आणून दिली गेली. त्यावर अनधिकृत बांधकाम तोडून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना गडकरींनी केल्या.
नागपूर-जबलपूर महामार्गाचे रुंदीकरण
मेट्रोसाठी कामठी येथे रस्त्याच्या रुंदीकरणाचाही प्रस्ताव बैठकीत मंजूर करण्यात आला. हा रस्ता नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग आहे. त्यामुळे त्याचे रुंदीकरण झाल्यावर वाहतूक अधिक सोयीची होणार आहे. यावेळी बुटीबोरी ते उमरेड हा रस्ता केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ)मधून मंजूर करण्याचे निर्देश गडकरींनी दिले.
Governor of Maharashtra : संरक्षणदृष्ट्या देश आत्मनिर्भर होण्याची गरज
कोराडी येथे ‘रोप-वे’चा प्रस्ताव
श्री कोराडी महालक्ष्मी देवस्थानांतर्गत श्री महादेव टेकडी ते हनुमान मंदिर या ठिकाणी रोप-वेच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. त्यावर गडकरींनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या.