Breaking

Amravati MIDC : कारखाने बंद झालेत, रोजगाराच्या संधीही घटल्या

Industrial sector in Amravati in trouble : औद्योगिक क्षेत्राकडे दुर्लक्ष, अमरावतीतील उद्योग क्षेत्र अडचणीत

Amravati : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्र सध्या गंभीर संकटातून जात आहे. जमिनीचे वाढलेले दर, दुहेरी करपद्धती, विजेचे वाढलेले दर, तसेच बंद पडलेल्या उद्योगांची मालमत्ता विक्रीसाठी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्र अडचणीत सापडले आहे. शासनाकडून मोठ्या, मध्यम व लघु उद्योगांबाबत प्रभावी धोरणे आखण्यात उदासीनता असल्याने अनेक उद्योग बंद पडले असून अनेक अडचणींत सापडले आहेत.

जिल्ह्यात रेल्वे, रस्ते, विमानतळ, वीज, पाणी यांसारख्या भौतिक सुविधा उपलब्ध असूनही उद्योग तग धरण्यात अपयशी ठरत आहेत. परिणामी, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळेनाशा झाला आहे.

MP Balwant Wankhede : शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य काय?

जिल्ह्यात अमरावती शहर व नांदगाव पेठ येथे अनुक्रमे एमआयडीसी व पंचतारांकीत एमआयडीसी औद्योगिक वसाहती आहेत. याशिवाय चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी-वरुड, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आणि भातकुली या तालुक्यांमध्ये औद्योगिक क्षेत्र निर्माण करण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी कार्यरत उद्योगांची स्थिती अत्यंत खराब असून अनेक कारखाने बंद पडले आहेत.

“राज्य सरकारकडे उद्योगांचे आजारपण शोधण्याची स्वतंत्र यंत्रणा नाही. शासनाच्या उदासीन धोरणामुळेच अमरावती जिल्ह्याचे औद्योगिक क्षेत्र ‘ड प्लस’ श्रेणीत आले आहे,” असे मत एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी व्यक्त केले.

“नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील जमिनीचे दर एक वर्षासाठी कमी करण्यात आले आहेत. विजेच्या दरांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार शासनाकडे आहे. काही बंद झालेल्या उद्योगांना आर्थिक अडचणी व थकीत वेतनाची समस्याही होती,” असे प्रादेशिक अधिकारी राम लंगे, महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ, नांदगाव पेठ यांनी सांगितले.

मुंबईवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज
“अमरावतीत उद्योग सुरू करण्यासाठी सगळी प्रक्रिया मुंबईत करावी लागते. त्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो. पीएम मित्रा टेक्स्टाइल पार्क अमरावतीस मिळालेला असला तरी इतर उद्योगांसाठी जिल्हा पातळीवर स्वतंत्र, सक्षम यंत्रणा हवी,” अशी मागणी एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनने केली आहे.

West Vidarbha : पश्चिम विदर्भातील प्रादेशिक असमतोलावर संशोधन

बंद पडलेले प्रमुख उद्योग :

फिन्ले मिल, अचलपूर : गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली ही मिल सुरू करण्याचे प्रयत्न अद्याप अपुरेच ठरत आहेत.
संत गाडगेबाबा सूत गिरणी, दर्यापूर : ही गिरणीही अजून सुरू झालेली नाही. लवकरच यासंदर्भात मुंबईत उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे सांगण्यात येते.
साखर कारखाना, अंजनगाव सुर्जी : या कारखान्याच्या सुरूवातीसाठी कुठलेही हालचाल दिसून येत नाही.