Due to Pranjal Khewalkar, Khadses family suffered a big shock : प्रांजल खेवलकरमुळे खडसेंच्या कुटुंबाला मोठा धक्का
Pune : राज्याचे माजी महसूलमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पुण्यातील उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत खेवलकरला रंगेहाथ अटक केली. या पार्टीमध्ये दारू, हुक्का आणि अमली पदार्थांचा वापर होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
छाप्यात खेवलकरसह त्याचा एक मित्र आणि तीन महिला सहभागी असल्याचे उघड झाले आहे. सर्वांना ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी दारूच्या बाटल्या, हुक्का सेट आणि काही प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पार्टीत नेमकं कोणते पदार्थ वापरले गेले, याची वैद्यकीय तपासणीतून माहिती मिळणार आहे.
प्रांजल खेवलकर यांचं नाव यापूर्वीही वादात आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार अवैध नोंदणीची असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे खडसेंच्या जावयाच्या चर्चेत राहण्याचा सिलसिला पुन्हा सुरू झाला आहे. या प्रकारामुळे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा संशयाची छाया पडली आहे. रोहिणी खडसे सध्या या प्रकरणाची माहिती घेत असून, यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.