व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Tribal Pardhi Society : धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजावर पोलिसांचा अन्याय

Tribal Pardhi Society : धाराशिव जिल्ह्यात पारधी समाजावर पोलिसांचा अन्याय

Police injustice against Pardhi community in Dharashiv district : शाळकरी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, समाजबांधव आंदोलनाच्या पावित्र्यात

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील कर्नाटक सीमेवर असलेल्या सिदगाव येथील पारधी समाजावर स्थानिक पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अत्याचार होत असल्याचा गंभीर आरोप भोसले कुटुंबीयांनी केला आहे. यातील १२वी शिकणारा विद्यार्थी धर्मेंद्र भोसले याच्यावर पोलिसांनी तब्बल १४ खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. शेताच्या कामावरून परत येताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी धर्मेंद्रला अटक केली, ज्यामुळे त्याचे शिक्षण आणि भवितव्य धोक्यात आले आहे.

पारधी समाजातील विद्यार्थी, महिला आणि बालकांवरही चोरी आणि दरोडेखोरीचे खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा छळ होत असल्याचा आरोप स्थानिक पारधी बांधवानी केला आहे. पोलिसांच्या या जाचाला कंटाळून आदिवासी पारधी समाजातील रुख्मिणीबाई लक्ष्मण भोसले, पूजा किरण भोसले, कावेरी धर्मेंद्र भोसले, बायडी विलास भोसले आणि अंजली सुनील शिंदे यांनी गेल्या चार दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील पोलीस गुन्हे शाखा कार्यालयासमोर आदिवासी पारधी क्रांती संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे मातोश्रीवर जाताच महायुती सतर्क

आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, पारधी समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडूनही पारधी समाजावर अत्याचार होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या उपोषणाद्वारे त्यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासनाकडे निष्पक्ष तपास आणि न्यायाची मागणी केली आहे.

सोलापूर येथील रहिवासी आणि दलित पँथर संघटनेच्या महिला उपाध्यक्षा उषा समीर शिंदे यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पीडित पारधी कुटुंबियांना तात्काळ न्याय देण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर दलित पँथरच्यावतीने राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पारधी समाजातील एलएलबीचा विद्यार्थी सचिन शिंदे यांनेही पोलीस अधीक्षकांना भेटून धर्मेंद्र भोसले यांच्यावरील १४ खोट्या गुन्ह्यांचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली आहे.

धर्मेंद्र याचे १२वीनंतर बीएचे शिक्षण सुरू असताना पोलिसांनी त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याने त्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सचिन यांनी मागणी केली की, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा देऊन निरपराध पारधी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतले जावे. आदिवासी पारधी समाज हा उपेक्षित आणि सामाजिक बहिष्काराचा बळी ठरलेला समुदाय आहे. धाराशिव जिल्ह्यातील या घटनेने त्यांच्यावरील अन्याय पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. धर्मेंद्र भोसले याच्यासारख्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याची भीती आहे, ज्यामुळे संपूर्ण समाजाच्या प्रगतीवर परिणाम होऊ शकतो.

Devendra Fadanvis : महाराष्ट्राच्या मनात काय, हे ‘स्थानिक’च्या निवडणुकांमध्ये दिसेल !

पारधी समाजाच्या या लढ्याला व्यापक पाठिंबा मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि संघटना यांनी प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ लक्ष घालण्याची मागणी केली आहे. खोट्या गुन्ह्यांचा निष्पक्ष तपास, दोषींवर कठोर कारवाई आणि आदिवासी पारधी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जर ही मागणी पूर्ण झाली नाही, तर राज्यभरात रस्ता रोको आणि इतर आंदोलने तीव्र होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!