79 more polling stations for municipal council elections : १५५ प्रभागांत ४३९ केंद्र प्रस्तावित; मतदारसंख्या वाढीमुळे निर्णय
Amravati जिल्ह्यातील १० नगरपरिषद आणि २ नगरपंचायतींसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा धडाका सुरू असून, यंदा ७९ नव्या मतदान केंद्रांची वाढ होणार आहे. मागील निवडणुकीत ३६० मतदान केंद्रे होती, तर यावेळी एकूण ४३९ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. क्षेत्रवाढ आणि मतदारसंख्येतील वाढ लक्षात घेता ही वाढ करण्यात आली आहे.
अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मोर्शी, शेंदूरजना घाट, वरुड या नगरपरिषदांसह धारणी व नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. या सर्व ठिकाणी प्रभाग रचनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आणि आयुक्त दिनेश वाघमारे यांनी संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला आहे.
Mahayuti Government : महाविकास आघाडीने सुरू केलेली योजना अडचणीत!
विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये या भागात ३,५४,०४२ मतदार होते. १ जुलै २०२५ पर्यंत ही संख्या वाढून ३,५८,८६८ झाली आहे. धारणी आणि नांदगाव खंडेश्वर नगरपंचायती वगळता उर्वरित सर्व नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येत आहे. यामध्ये ८०० ते ९०० मतदारांसाठी ४०५ मतदान केंद्रे आणि ९०० ते १,००० मतदारांसाठी ३४ केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
या निवडणुकीत एकूण १५५ प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे १२ निवडणूक निर्णय अधिकारी आवश्यक असून, सध्या ४ अधिकाऱ्यांची कमतरता आहे. तसेच १२ तहसीलदार उपलब्ध आहेत. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी किमान २,००० अधिकारी व कर्मचारी आवश्यक असून, यासाठी नियोजन सुरू आहे.
Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा
मतदान केंद्रांवर मतदार यादी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, दिव्यांगासाठी सुविधा आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मतमोजणीसाठी तालुकास्तरावर पुरेशी जागा असलेले गोडाऊन तयार ठेवावेत, असेही सांगण्यात आले आहे. सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निवडणूक पारदर्शक, शांततापूर्ण आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जबाबदारीने कार्य करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.