Accused attempts suicide by consuming poison : माळेगाव अतिक्रमण प्रकरण; आरोपीचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न
Buldhana “घर मोडलं, दार मोडलं, उघड्यावर कसं राहायचं? जमीन गेली, पोट कसं भरायचं?” अशा शब्दांत वनविभागाविरोधात संताप व्यक्त करत माळेगाव प्रकरणातील आरोपी भीमसिंग गायकवाड (वय ५५) यांनी विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. हे प्रकरण अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे उद्भवलेल्या सामाजिक असंतोषाचं गंभीर उदाहरण ठरत आहे.
मोताळा वन परिक्षेत्रातील माळेगाव परिसरात अनेक आदिवासी कुटुंबं तीन दशकांपासून राहत होती. वनजमिनीवर कसून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना वनविभागाच्या अतिक्रमणविरोधी कारवाईने उघड्यावर आणले. पर्यायी निवारा किंवा पुनर्वसनाशिवाय प्रशासनाने धडक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या जमावाने २३ जुलै रोजी पोलिस व वनविभागाच्या पथकावर हल्ला केला होता.
या प्रकरणी २० ते २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील फरार आरोपी भीमसिंग गायकवाड याने २९ जुलै रोजी विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गायकवाड यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत “वनअधिकाऱ्यांनी भर पावसाळ्यात घरं मोडली, पैसे खाऊन पुन्हा तोडफोड केली. त्यामुळेच हल्ला झाला, आणि आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं,” असा उल्लेख आहे. चिठ्ठीत अजून १० ते १५ आदिवासी पुढील काही दिवसांत आत्महत्या करू शकतात, असा इशाराही दिला आहे.
या प्रकरणामुळे वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीवर तसेच आदिवासी पुनर्वसनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयीन आदेशानंतर कारवाई झाली असली तरी सरकारच्या दुर्लक्षामुळे शेकडो कुटुंबं बेघर झाल्याची परिस्थिती तयार झाली आहे. विरोधकांकडून या प्रकरणात सरकारची संवेदनशून्यता, तसेच वनविभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Hybrid annuity scheme : २०० कोटींच्या रस्त्याच्या गुणवत्तेवर माजी राज्यमंत्र्यांचा सवाल
प्रकरणाशी संबंधित शेषराव गायकवाड, शिवाजी मोरे, अर्जुन फुलमाळी, संजय पिंपळे, राजू पिंपळे, रामदास मोरे, विष्णू गायकवाड, प्रताप गायकवाड, अरुण वंजारी आदींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २३ जुलै रोजी झालेल्या हल्ल्यात पोलिस व वनविभागाचे १८ कर्मचारी जखमी झाले होते.