The story told by Fadnavis on the occasion of Divyas felicitation : दिव्याच्या सत्कार प्रसंगी फडणवीस यांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Nagpur : नागपूरच्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुखने जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्ण यशाने संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्वल केले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राज्य सरकारकडून नागपूर येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून दिव्याचं कौतुक केलं आणि तिच्या यशाचा “तिहेरी अभिमान” असल्याचं सांगितलं.
फडणवीस म्हणाले, दिव्यामुळे देशाचा, महाराष्ट्राचा आणि नागपूरकर म्हणून माझा अभिमान वाढलाय. ती फक्त बुद्धीबळात नाही, तर प्रत्येक तरुणासाठी प्रेरणा ठरली आहे. या भाषणादरम्यान त्यांनी एक मंत्रिमंडळातील मिश्कील किस्साही सांगितला. “कॅबिनेटमध्ये दिव्याच्या अभिनंदनाचा ठराव झाला तेव्हा छगन भुजबळ म्हणाले, ‘नागपूरचे लोक खूपच बुद्धीमान असतात!’ त्यावर मीही हसत उत्तर दिलं – आम्हीही राजकारणात बुद्धीबळच खेळतो, आणि चेकमेटही करतो!”
दिव्याच्या या विजयाबद्दल खुद्द दिव्यानेही मनोगत व्यक्त केलं. “हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. नागपूर माझं घर आहे आणि महाराष्ट्र सरकारकडून वेळोवेळी मिळालेला पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरलाय,” असं ती म्हणाली. तिच्या या विजयानंतर पुढचं लक्ष्य वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकणं असल्याचं तिनं ठामपणे सांगितलं.
कार्यक्रमात नव्याने नियुक्त झालेल्या राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनीही दिव्याचं कौतुक करत म्हटलं, “दिव्यासारखे खेळाडू घडावेत म्हणून आम्ही नव्या योजना आणणार आहोत. दिव्या, तुझ्या पाठीशी महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे.” दिव्याच्या या ‘चेकमेट’मुळे नागपूर पुन्हा बुद्धीच्या नकाशावर उजळून निघालं आहे, आणि मंत्रिमंडळातही तिच्या नावाने राजकारणातल्या खेळाडूंना थोडंसं बुद्धीबळ आठवलं आहे!
_____