Breaking

Devendra Fadnavis : संत्रा उन्नती प्रकल्पाचे काय? आठ वर्षांनंतरही फक्त वचनपूर्तीची प्रतीक्षा!

The Orange Project has been stalled for eight years : मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन हवेत विरलं

Amravati विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरणार होता असा दावे करण्यात आलेला जैन फार्म फ्रेश-हिन्दुस्थान कोकाकोला संत्रा उन्नती प्रकल्प आजही केवळ आश्वासनांच्या विळख्यात अडकून आहे. २९ डिसेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणाठुनी (ता. मोर्शी) येथे मोठ्या थाटात या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र, तब्बल आठ वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रकल्पाची कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित फूड प्रोसेसिंग प्लांट उभारण्याचा दावा करण्यात आला होता. जैन इरिगेशन आणि कोकाकोला ब्रिव्हरेज इंडिया यांचा हा संयुक्त उपक्रम ‘मेक इन इंडिया’च्या पार्श्वभूमीवर १३ फेब्रुवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारानंतर साकार होणार होता.

मोर्शी-वरूड परिसरातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची आशा या प्रकल्पाशी जोडलेली होती. परंतु, वेळोवेळी १९५७, १९६३, १९९२, २०१४, २०१७, २०१९ आणि २०२१ मध्ये केलेल्या घोषणांचं काय झालं, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.

Maharashtra politics : एकनाथ शिंदेंनी उठाव केलाच नसता, पण…

संत्र्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली यंत्रणा उभी राहिलेली नाही. परिणामी, उत्पादन चांगले असूनही शेतकऱ्यांना रास्त दर मिळत नाही. व्यापारी दर्जेदार संत्री खरेदी करतात, तर दुसऱ्या दर्जाची संत्री वाया जाते.

मोर्शी तालुक्यातील मायवाडी येथे उभारण्यात आलेली एमआयडीसीदेखील फक्त नावापुरती उरली आहे. शासनाच्या धोरणात स्पष्टता नसल्यामुळे ना रोजगार निर्माण झाला, ना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शेतकरी संघटनांनी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रूपेश वाळके यांनी याबाबत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधले आहे.

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

विदर्भातील १.५ लाख हेक्टर क्षेत्रावर संत्रा उत्पादन होत असले तरी प्रक्रियेसाठी सरकारकडून कोणतेही पायाभूत प्रयत्न होताना दिसत नाहीत. बांगलादेशसह इतर देशांत निर्यात आणि ब्रँडिंगच्या संधी असतानाही, शासन आणि उद्योगजगतातील असंवेदनशीलता हेच संत्रा उत्पादकांच्या दु:खाचे मूळ आहे.