Breaking

Farmers movement : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठी हालचाल

Bachchu Kadu likely to meet Raj Thackeray on Wednesday : बुधवारी बच्चू कडू राज ठाकरे भेटीची शक्यता

Mumbai: राजकीय वर्तुळात सध्या एक मोठी चर्चा रंगली आहे, ती म्हणजे बुधवार 6 ऑगस्टला प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची होणारी महत्त्वपूर्ण भेट. ही भेट केवळ दोन नेत्यांमधील सदिच्छा भेट न ठरता, ती शेतकरी आंदोलनाला बळ देणारी निर्णायक भेट ठरू शकते, अशी शक्यता राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

मागील काही महिन्यांपासून बच्चू कडू यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा त्यांनी आक्रमकपणे हाताळला आहे. महायुती सरकारने निवडणुकीआधी ‘सातबारा कोरा’ करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सत्ता स्थापन होऊन दहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या हातात काहीही लागलेलं नाही. यामुळे राज्यभरात नाराजीचा सूर तीव्र होत आहे.
याच पार्श्वभूमीवर कडूंनी शेतकरी आंदोलनाचे आयोजन केले. त्यामध्ये हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. त्यांच्या मागण्या केवळ कर्जमाफीपुरत्या मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक व सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने आहेत.

Chandrashekhar Bawankule : मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही !

या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होत, ठाम शब्दांत शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडली. “कुठूनही पैसे आणा, पण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे यांनीही या आंदोलनाबाबत संवेदनशीलता दाखवत, “पाठिंबा देणं पुरेसं नाही, तर प्रत्यक्ष उपस्थित राहा,” असे बाळा नांदगावकरांना बजावल्याचं समजतं. त्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता वाढली आहे.

Uddhav Raj alliance : आम्ही 20 वर्षांनी एकत्र आलो, मग तुम्ही का वाद घालता?

राज ठाकरे सध्या ‘ना झेंडा, फक्त मराठीच अजेंडा’ या घोषणेसह राजकीय आंदोलनात सक्रिय झाले आहेत. मराठी भाषेपासून ते उद्योगांमधील मराठी माणसाच्या सहभागापर्यंत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकत्याच पार पडलेल्या शेकाप मेळाव्यातही त्यांनी “शेतजमिनी विकू नका” आणि “मराठी तरुणांना उद्योगात संधी द्या” असे मुद्दे उपस्थित केले. लाल झेंड्याच्या व्यासपीठावर भगव्या झेंड्याचं आगमन हे त्यांच्या भूमिकेचं प्रतीक बनलं आहे.

Bacchu Kadu : मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?

या सगळ्या घडामोडींमध्ये बच्चू कडू यांचं आंदोलन आणि राज ठाकरेंची भूमिकाही एकाच दिशेने जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे ६ ऑगस्टला होणारी भेट केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते असे मानले जात आहे.

बच्चू कडू आणि राज ठाकरे हे दोघेही सत्ताधाऱ्यांविरोधात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या एकत्रित भूमिकेमुळे राज्यात नव्या राजकीय फ्रंटची शक्यता निर्माण होते आहे. विशेषतः शेतकरी, युवक आणि ग्रामीण मतदारांमध्ये या दोघांच्या समर्थकांची चांगली उपस्थिती आहे.त्यामुळे जर ही भेट यशस्वी ठरली, तर राज्याच्या आगामी राजकारणात मोठे राजकीय वळण येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

_____