Financial irregularities of Rs 6.88 crore in Khadakpurna project : मुंबईतील ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल
Buldhana विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या खडकपूर्णा प्रकल्पातील उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत झालेल्या मातीकरणाच्या कामात तब्बल ६ कोटी ८८ लाख रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे. याप्रकरणी मुंबईतील ठेकेदार सैयद खाजा मोहिद्दीन यांच्या विरोधात २ ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेच्या आदेशावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) मार्फत चौकशीनंतर करण्यात आली आहे.
Vidarbha Farmers : शेती उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल, मदतीची फक्त घोषणाच!
एसीबीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, कंत्राटदाराने ज्या प्रमाणात काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले, प्रत्यक्षात त्यात कोणतेही काम झालेले नव्हते. उदाहरणार्थ, १९,८९० घनमीटर मातीकरणाचे काम दाखवले गेले होते, पण प्रत्यक्षात एकही घनमीटर काम झाले नसल्याचे समोर आले.
नागपूर खंडपीठात १२ डिसेंबर २०१४ रोजी दाखल जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य शासनाला सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, जलसंपदा विभागाचे मुंबई येथील मुख्य अभियंता आणि अमरावती परिक्षेत्रातील एसीबीच्या माध्यमातून मातीकरण आणि इतर संबंधित कामांची चौकशी करण्यात आली. त्यातून घोटाळ्याचे स्वरूप स्पष्ट झाले.
सन २००९-१० मधील निविदा प्रक्रियेत एस. एफ. कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने बनावट अनुभवपत्रे सादर करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागातील खोट्या माहितीच्या आधारे ठेकेदाराने तांत्रिक पात्रता दर्शवली आणि कंत्राट मिळवले. यामुळे इतर पात्र ठेकेदारांना डावलण्यात आले.
Samruddhi Mahamarg : निचऱ्याअभावी ‘समृद्धी’ लगतच्या शेतात पाणीच पाणी
सध्या एसीबीचे पोलिस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, अधिकृत दस्तऐवजांमध्ये खोटेपणा करणे आणि शासनाची फसवणूक करणे या विविध कलमांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय भारत चपैतकर करीत आहेत.