District President Vijayraj Shinde’s appeal to get ready for local election : एकजुटीने काम करण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचे आवाहन
Lonar आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाताना भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघपणे कामाला लागण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी दिले. लोणार येथे रविवारी (दि. ३ ऑगस्ट) आयोजित भाजपा कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
लोणार येथील बनमेरु कॉलेजच्या जुन्या इमारतीत पार पडलेल्या या मेळाव्यात जिल्हा भाजपा नेतृत्वाने आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रणशिंग फुंकले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष गणेश मांटे, प्रकाश गवई, दत्ता पाटील, विजय पवार, चंद्रकांत बरडे, संतोष काळे, चक्रधर लांडे यांच्यासह शहर व तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Malegao Encroachment : माळेगाव वनजमिनीवरील अतिक्रमणावर मोठी कारवाई
“ही केवळ बैठक नाही, तर पक्षाच्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात आहे,” असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने, भाजपने आता तयारीला सुरुवात केली असून, प्रत्येक जागा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी युद्धपातळीवर काम करावे, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एनडीएविरोधात “घाबरवा आणि गोंधळवा” अशी रणनीती आखली होती. मात्र, राज्यातील लाडकी बहिण योजना, शेतकऱ्यांसाठीच्या धोरणात्मक निर्णयांमुळे विधानसभेत महायुतीला मोठे यश मिळाले, हे शिंदे यांनी अधोरेखित केले. “विरोधक केवळ टीका करतात, पण आम्ही काम करून दाखवतो,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
या मेळाव्याच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, भाजपाचे संघटन आणखी भक्कम झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणार, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात शहर अध्यक्षपदी शुभम बनमेरू यांची फेरनिवड करण्यात आली, तर तालुका अध्यक्ष निवडीवर नाराजी व्यक्त करणारे गजानन मापारी यांची तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करून संघटनात समन्वय निर्माण करण्यात आला. या निवडीनंतर स्थानिक पातळीवर पक्षबांधणीला नवे बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमध्ये उमटली.