Manoj Jarange Patils serious accusation and warning : मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप व इशारा
Mumbai : मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत, अंतरवली सराटी येथे पोलिसांकडून करण्यात आलेली लाठीमाराची घटना फडणवीस यांच्या आदेशावरूनच झाल्याचा दावा केला आहे. जर त्यांनी आदेश दिला नसता, तर पोलिसांची हिंमतच झाली नसती, असं वक्तव्य करत जरांगेंनी राजकीय पातळीवर मोठा हल्ला दिला आहे.
वृत्तवाहिनीशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, पहिल्या आरक्षण लढ्यात सरकारकडून निघालेला शासन निर्णय योग्य होता. मात्र, अंमलबजावणीत आम्हाला फसवलं गेलं. त्यामुळे आता याचाच जाब विचारायचा आहे. सरकारने मुंबई येण्याची वेळ येऊ देऊ नये, कारण एकदा आम्ही निघालो की मग माघार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला.
देवेंद्र फडणवीस तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका. गोडीगुलाबी असेल तर स्वागत आहे, पण पुन्हा काही भानगड करायला गेलात, तर त्याची किंमत तुम्हालाही आणि पंतप्रधानांनाही चुकवावी लागेल. ही धमकी नाही, समजावण्याचा प्रयत्न आहे,अशा शब्दांत जरांगे पाटलांनी भावना व्यक्त केली आहे.
जरांगे यांनी पुन्हा स्पष्ट केलं की, आम्ही जातीवादी नाही. मंडल कमिशननंतर इतर समाजांना मिळालेल्या आरक्षणावर आम्ही कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही. मग आमचं आरक्षण का रोखलं जातंय? हे दुजाभावाचं राजकारण आम्ही सहन करणार नाही.” जरांगे यांनी जाहीर केलं आहे की, येत्या 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईत धडक देणार आहेत.
या आंदोलनाला निर्णायक वळण मिळणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. आंदोलन मुंबईत नेण्याच्या त्यांच्या इशाऱ्यामुळे राज्यातील सत्ताकेंद्रात अस्वस्थता पसरली आहे.
Manoj Jarange : आरपारची लढाई, तिसर्या दिवशी आरक्षणाचा गुलाल !
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या तयारीत आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य करण्यात आल्यामुळे, हे आंदोलन केवळ सामाजिक राहिले नसून, त्याला तीव्र राजकीय वळणही मिळालं आहे. 29 ऑगस्टच्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याची दिशा आणि सरकारची भूमिका काय राहते, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
_____