Bachchu Kadu meets Raj Thackeray at Shiv Tirtha : शिवतीर्थावर बच्चू कडूंची राज ठाकरे भेट
Mumbai : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी ‘शिवतीर्थ’ येथे भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले असून, शेतकरी प्रश्नाच्या मुद्द्यावरून राजकीय एकजुटीचे संकेत मिळू लागले आहेत.
या भेटीत बच्चू कडूंनी राज ठाकरे यांना यवतमाळमध्ये होणाऱ्या शेतकरी यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आहे, आता ती एक दिवस शेतकऱ्यांसाठी बंद राहायला हवी.” या मागणीमुळे शेतकरी आंदोलनाला मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतून पाठिंबा मिळावा, हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी सरकारवर टीका केली. “शेतकऱ्यांचा प्रश्न हा केवळ माझा नव्हे, सर्वांचा आहे. हे आंदोलन माझ्या नावापुरतं न राहता शेतकऱ्यांचं व्हायला हवं. सरकार केवळ टिंगलटवाळी करत आहे. फडणवीस म्हणतात दुष्काळ पडला तरच कर्जमाफीचा विचार करू. म्हणजे आता सरकार दुष्काळाची वाट पाहतंय का?” असा सवाल कडूंनी उपस्थित केला.
बच्चू कडूंनी राज ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सक्रिय पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. “मुंबईने काही तास का होईना, शेतकऱ्यांसाठी थांबावं. राज ठाकरे यांचा आवाज देशाच्या राजधानीतून शेतकऱ्यांना दिलासा देईल,” असं कडूंनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅटबाबतच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. “निवडणुका भाजप कार्यालयातूनच घ्या. सामान्य कार्यकर्ताही आता विचारतो की, ईव्हीएम जर आहे, तर निवडणूक का लढता? ही भावना घातक आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
Maratha movement : अंतरवली मारहाणीमागे फडणवीसच; 29 ऑगस्टला मुंबई धडकणार !
“मनसे आणि प्रहार एकत्र येऊन निवडणूक लढणार का?” या प्रश्नावर कडूंनी स्पष्ट केलं की, “सध्या निवडणूक हा अजेंडा नाही. शेतकरी एकत्र येत नाही, हाच खरा प्रश्न आहे.”
या भेटीमुळे आगामी काळात शेतकरी प्रश्नावरून नव्या राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण झाली असून, आंदोलन आणि राजकीय गोटात खळबळ उडण्याची चिन्हं दिसत आहेत.