Police Commissioner who blocked traffic was publicly reprimanded : वाहतूक अडवणाऱ्या पोलीस आयुक्तांना सर्वांसमोर सुनावलं
Pune : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पहाटेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकाची पाहणी केली. पुणे – नाशिक आणि चाकण – शिक्रापूर मार्गावरील हा चौक दररोज कोंडीत अडकतो. याच चौकातून चाकण एमआयडीसीमध्ये जाणाऱ्या लाखभर वाहनांची रोजची वर्दळ असते. सुमारे 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आणि साडेतीन लाख कर्मचारी असलेल्या या औद्योगिक परिसराकडे जाणाऱ्या मार्गांवर दररोज प्रचंड अवजड वाहतूक होते. विशेषतः चाकण-शिक्रापूर मार्गावरून अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरकडून जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक कोंडी वाढवते. त्यामुळे या चौकातील वाहतूक समस्येचे निराकरण करणे हे सरकारपुढील मोठे आव्हान ठरणार आहे.
सकाळी सहा वाजता दौऱ्याची सुरुवात करून अजित पवारांनी थेट चाकण चौकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान पोलिसांनी वाहनं थांबवून ठेवली होती, यावर ते संतापले. “ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं वाहनं थांबवून कोंडी का केली? सगळी वाहतूक सुरु करा,” अशा शब्दांत त्यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे यांना सुनावले. त्याचवेळी त्यांनी अधिकाऱ्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटोही दाखवून तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले.
Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी
या नंतर अजित पवार बैठक घेणार असून, चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहेत. याआधी हिंजवडी आयटी पार्क परिसरातील कोंडीवर त्यांनी कठोर भूमिका घेतली होती. हिंजवडीनंतर आता माण गावकऱ्यांनीही रस्ते रुंदीकरणाला विरोध दर्शवला आहे. ग्रामसभेत 36 मीटर प्रस्तावित रस्त्यांना विरोध करून 24 मीटर रस्त्यांची मागणी करण्यात आली आहे. अजित पवारांनी दिलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या आदेशाला स्थानिकांचा विरोध असल्याने, हा प्रश्न कसा सोडवला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.