Breaking

NCP Ajit Pawar : राष्ट्रवादी लागली कामाला, स्थानिक निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर

NCP holds training camp for booth workers for local elections : बूथ कार्यकर्त्यांशी नेत्यांनी साधला संवाद, चुका सुधारून पुढे जाण्याचे आवाहन

Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने कामाला लागला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने देखील अकोला जिल्ह्यातील बुथ कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित केले. नेत्यांनी संवाद साधला. एवढेच नव्हे तर यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये झालेल्या चुका विसरण्याऐवजी सुधारून पुढे जाण्याचे आवाहन देखील केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने जिल्ह्यात प्रथमच बूथ कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुकृपा मंगल कार्यालय, अकोला येथे पार पडलेल्या या शिबिरात पक्ष बांधणी, संघटन विस्तार, नेतृत्व विकास आणि जनसंपर्क यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर जाणकारांनी सखोल मार्गदर्शन केले.

Rakshabandhan : महिलांनी काळी राखी बांधली, शेतकरी आत्महत्यांचा निषेध

शिबिराच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक सुभाष गादिया यांनी पक्ष बांधणीतील सूक्ष्म पैलूंवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, “छोट्या घटकांना जोडून प्रत्येक समूहाचे प्रतिनिधित्व सुनिश्चित केल्यासच पक्षाला नवी उभारी मिळू शकते.”

मीडिया समन्वयक संजय मिस्कीन यांनी नेतृत्वाच्या विचारधारेसह जनतेच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व पटवून दिले. प्रदेश सरचिटणीस सुभाष गायकवाड यांनी संघटना वाढविण्याच्या रणनीती स्पष्ट केल्या, तर माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी ‘बुथ संघटन व बूथ बांधणी’ या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, “जर राष्ट्रवादी काँग्रेसने अकोला जिल्ह्यात अशीच संघटनात्मक ताकद कायम ठेवली, तर पाचपैकी दोन विधानसभा मतदारसंघात विजय मिळवणे अवघड ठरणार नाही.”

या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी दिशा व प्रेरणा दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष मो. बदरूजम्मा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रतिभा अवचार, प्रदेश उपाध्यक्ष मदन भरगड, प्रदेश संघटक काशीराम साबळे, महिला प्रदेश संघटक संध्याताई वाघोडे, सुषमा राठोड, शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल काळणे, पदवीधर आघाडीचे अध्यक्ष राहुल इंगोले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Ravi Rana : नवनीत राणांच्या हत्येच्या कटात ८ ते १० जणांचा सहभाग

जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिराला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल थोरात यांनी केले.