Youth Congress objects to Guardian Minister’s visit to ‘Kitchen 365’ : अवैध धंद्यांना राजाश्रय?, पोलिसांच्या कारवाईवर पाणी फेरल्याचा आरोप
Amravati रविवार, ९ ऑगस्ट रोजी अमरावती दौऱ्यावर आलेल्या राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ‘किचन ३६५’ येथे जाऊन चहा-नाश्ता घेतल्याची घटना समोर आल्यानंतर युवक काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी रात्रंदिवस मोहिमा राबवित असताना, ज्यांच्या विरोधात समाजातील विविध घटक लढा देत आहेत, त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री उपस्थित राहणे हे गुन्हेगारी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
युवक काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, “वर्षातील बावन्न आठवडे आणि ३६५ दिवस जर आमचे गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन असेल, तर असा छुपा संदेश पालकमंत्र्यांना द्यायचा आहे का?”
Ravindra Chavhan : काँग्रेसच्या प्रदेश सचिवासह शेकडो भाजपमध्ये
अमरावती शहर गेल्या काही महिन्यांपासून नशा, जुगार, स्पा सेंटरमधील देहव्यवसाय, अवैध मद्यविक्री यांसारख्या धोकादायक प्रवृत्तींच्या विळख्यात अडकले आहे. विशेषतः तरुण पिढी पब आणि बारच्या आहारी जात असून, व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक झाले आहे. “हे केवळ एका पिढीचे मानसिक व शारीरिक नुकसान नसून, संपूर्ण समाजाच्या पाया पोखरण्याचे षडयंत्र आहे,” असा आरोप काँग्रेसने केला.
या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी साधू-संत, महिला कार्यकर्त्या, विविध राजकीय संघटनांचे युवा नेते रस्त्यावर उतरले. “व्यसनमुक्त अमरावती”साठी आंदोलने झाली, जनआक्रोश वाढला आणि त्याच्या दडपणाखाली प्रशासनाने अनेक पब-बार बंद केले. पोलिसांनी अवैध धंद्यांवर सतत धाडसत्रे राबविली.
मात्र, युवक काँग्रेसचे नेते समीर जवंजाळ, वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, सागर कलाने, योगेश बुंदेले, आशिष यादव, निखिल बिजवे, संकेत साहू यांनी एका पत्राद्वारे इशारा दिला की, जर पालकमंत्री अशा ठिकाणी जाऊन कारवाईला राजकीय अडथळा निर्माण करत असतील, तर “जवाब दो” आंदोलन उभारले जाईल. हे आंदोलन केवळ घोषणांपुरते मर्यादित नसेल, तर प्रत्यक्ष कारवाई आणि जनजागृतीद्वारे हा मुद्दा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नेला जाईल. माजी नगरसेवक मुन्ना राठोड यांनीसुद्धा पालकमंत्र्यांच्या भूमिकेचा विरोध दर्शविला आहे.
Local Body Elections : जिल्हा परिषदेच्या तीन गटांच्या प्रभाग रचनेत बदल; विभागीय आयुक्तांचा आदेश
“एकीकडे पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न मानून अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी मंत्री अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देत आहेत. हे पोलिस दलाच्या आत्मसन्मानावर थेट आघात असून, गुन्हेगारी प्रवृत्तींचे मनोधैर्य वाढवणारे आहे,” असा आक्षेप जवंजाळ यांनी नोंदविला.
“जर हा राजाश्रय नसेल, तर मग पालकमंत्री अशा ठिकाणी गेले कशासाठी? भेटीचा उद्देश काय होता? जर ही भेट समर्थनाचा संकेत असेल, तर प्रशासनाची कारवाई ही केवळ दिखावा आहे का?” असा सवाल युवक काँग्रेसने उपस्थित केला आहे.








