Uddhav Thackerays attack on BJP : उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
Mumbai : ही बोगस जनता पार्टी आहे. प्रामाणिक निवडणूक झाली तर हे महाराष्ट्र जिंकूच शकत नाहीत. मत चोरी करूनच हे सत्तेवर येतात. राहुल गांधी यांनी त्यांचा बुरखा फाडून टाकला आहे,” असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ठाकरे यांनी भाजपवर एकापाठोपाठ एक हल्ले चढवत, निवडणुका, राष्ट्रवाद आणि पाकिस्तानवरील भूमिकेवरून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “कबुतरांसाठी लोक रस्त्यावर उतरतात, कुत्रे आणि हत्तीसाठी उतरतात ही चांगली बाब आहे. पण पहलगाम हल्ल्यासारख्या प्रसंगी माणुसकी कुठं जाते? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलतात आणि देशाची टीम पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार? जय शाह, तुमचा कोण लागून गेला? आता क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?” असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला.
Mumbai police : 364 पोलिसांच्या पदोन्नतीचा आदेश 24 तासांत रद्द
त्यांनी पुढे भाजपवर टीका करताना म्हटलं की, “देशाचे सैनिक शौर्य गाजवतात, पण त्याचे श्रेय मात्र भाजप घेत असतो. सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्यांना ‘आतंकवाद्यांची बहीण’ म्हणणारे भाजपचे गधडे आहेत.” “जगात कोणी आपल्या पाठीशी नाही”
“जगभरात आपले शिष्टमंडळ फिरले. पण एकही देश भारताच्या बाजूने ठाम उभा राहिलेला नाही. आता पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार का? हा कोणता देशभक्तीचा डाव?” असा सवाल त्यांनी सरकारला केला. इतकंच नव्हे तर रशिया – अफगाणिस्तान युद्धाचे उदाहरण देत त्यांनी सांगितले, “त्या वेळी अमेरिकेनं ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकला होता. देश म्हणून ठाम भूमिका घेणे गरजेचे असते. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानसोबत चीनही होता. मग पाकिस्तानचा निषेध करणार का? की चीनचाही करणार? यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर आज हे कळलं असतं. पण दुर्दैवाने त्यांना चांगला शिक्षकच मिळाला नाही.”
Dr. Babasaheb Ambedkar College : ‘त्या’ प्राध्यापिकेचा फक्त विनयभंगच नाही, तर बळजबरीचाही प्रयत्न !
घुसखोरी आणि शेजारी देशांच्या राजकारणावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “बांगलादेशच्या शेख हसीनाला आम्ही आसरा दिला नाही. पण तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना आसरा देता. कुणाची कीव करायची हेच तुम्हाला समजत नाही. या सगळ्यांची कीव येते पण नेमकी कुणाची करायची हे कळत नाही,” असा टोला त्यांनी लगावला. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट नाव घेऊन जोरदार हल्ला केला. निवडणूक, पाकिस्तान बरोबर क्रिकेट, घुसखोरी, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकार आणि भाजपवर त्यांनी जोरदार घणाघात केला.
_____