Farmers insulted by Pasha Patel’s insensitive statement : महादेव जानकरांचा संताप, अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
Akola “शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी” असा सल्ला देणारे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी तीव्र टीका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सांगवामेळ येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जानकर म्हणाले, “सत्तेवर असताना जबाबदारी झटकून संवेदनाहीन वक्तव्य करणे योग्य नाही. हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.”
Prataprao Jadhav, Siddharth Kharat : माजी मंत्र्याचे केंद्रीय मंत्री व आमदाराला खरमरीत पत्र!
पाशा पटेल यांनी धाराशिव येथे माध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते, “वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी ३३२ दिवस शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी.” याशिवाय त्यांनी असेही सांगितले होते की, “अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान आता सरकार भरून देऊ शकत नाही.”
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जानकर म्हणाले, “शेतकऱ्यांना संकटाच्या काळात दिलासा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे.सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीकडून जबाबदारी झटकणारे विधान अपेक्षित नाही.”
जानकर पुढे म्हणाले, “अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पाशा पटेल यांच्याकडून असे शब्द निघणे हे शेतकऱ्यांचा अपमान करणारे असून त्यांची मानसिकता स्पष्ट करणारे आहे.”
दरम्यान, महादेव जानकर यांनी अतिवृष्टीग्रस्त सांगवामेळ, भटोरी, पारध, कौलखेड जहांगीर या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. त्यानंतर जानकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर आणि जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
जानकर यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, “शेतकऱ्यांना दु:खाच्या काळात आश्वासन नव्हे, तर ठोस उपाययोजना अपेक्षित आहेत. संवेदनाहीन विधान करून समस्या सुटत नाहीत; उलट जनतेचा रोष वाढतो.”








