Grand exhibition of potholes held in front of the Municipal Corporation in Nagpur : रस्त्यांच्या दुरवस्थेवर युवक काँग्रेस आक्रमक
Nagpur : नागपुरात रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. उड्डाण पुल आणि ऑटोमॅटीव्ह चौक ते कन्हान या मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांची पार धुळदाण उडाली आहे. नव्याने केलेले रस्तेही खोदले जात आहेत. परिणामी रोज कुठे ना कुठे अपघात होऊन लोक जखमी होत आहेत. नागपूरकर कमालीचे त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन युवक काँग्रेसने महानगरपालिकेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. युवक काँग्रेसचे सरचिटणीस केतन ठाकरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेसमोर शहरातील खड्ड्यांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले.
युवक काँग्रेसने नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शहरातील खड्ड्यांचे फोटो आणि प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून प्रशासनासमोर वस्तुस्थिती मांडली. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यावर महानगरपालिकेने कारवाई करावी, यासाठी युवक काँग्रेसने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. मोर्चानंतर आयुक्त अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, सर्वत्र पडलेले खड्डे आणि त्यातून होणारे अपघात याकडे महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यात आले.
Pandit Vs Hake : लक्ष्मण हाके हा अदखलपात्र रिचार्जवाला श्वान !
महानगरपालिकेची निष्क्रीयता नागपूरकरांसाठी घातक ठरत आहे. आताही महानगरपालिका प्रशासनाने यावर उपाययोजना केली नाही, तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केतन ठाकरे यांनी दिला आहे. महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष अॅक्टीव मोडवर आले आहेत. शहरातील रस्त्यांच्या समस्यांबाबत युवक काँग्रेसने पहिला नंबर मारला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) पाण्याच्या समस्येवरून महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यांनीही महानगरपालिकेसमोर आंदोलन केले होते. आता निवडणूक तोंडावर असल्यामुळे राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. निवडणुका झाल्या की परिस्थिती पुन्हा जैसे थे होणार, अशा प्रतिक्रिया जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत.








