Illegal liquor sale : अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा मोर्चा; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Women warned of protest if no action taken : सामाजिक संतुलन बिघडले, महिलांच्या सुरक्षेलाही धोका

Shegao शहरातील तीन पुतळा, दसरा नगर आणि गणेश नगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू तसेच गांजाविक्रीविरोधात महिलांनी संताप व्यक्त करत शेगाव शहर पोलीस ठाण्यात मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली.

स्थानिक महिलांनी सांगितले की, या भागात काही नागरिकांकडून देशी दारू आणि गांज्याचा अवैध व्यापार धडधडीत सुरू आहे. यामुळे युवक व्यसनाधीन होत आहेत, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, तसेच काहींना प्राणही गमवावे लागले आहेत. अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक संतुलन बिघडत असून महिलांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाला आहे, अशी तीव्र भावना महिलांनी व्यक्त केली.

Sanjay Khodke Sulbha Khodke : रेल्वे ओव्हरब्रिज बंद; आमदार दाम्पत्य पोहोचले घटनास्थळी

मोर्चादरम्यान महिलांनी अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांनी इशारा दिला की, एका आठवड्यात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल. महिलांच्या या आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

यावेळी पोलीस ठाणेदार नितीन पाटील यांनी महिलांशी संवाद साधून अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर महिलांनी आंदोलन स्थगित केले, मात्र कारवाईबाबत ठोस पावले न उचलल्यास पुढील टप्प्यात अधिक मोठे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Harish Pimple : उमा बॅरेज प्रकल्पात तब्बल २७ कोटींचा घोटाळा?, आमदार हरीष पिंपळे यांचा गंभीर आरोप

दरम्यान, या भागातील गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारू आणि गांजाविक्रीबाबत नागरिक तक्रारी करत आहेत, मात्र ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढला आहे. पोलीस प्रशासन आता खरोखरच कडक पावले उचलते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी राजेंद्र शेगोकार, नितीन शेगोकार यांच्यासह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या मोर्चामुळे शहरात अवैध धंद्यांविरोधात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.