Devendra Fadnavis confident speech : देवेंद्र फडणवीसांचा आत्मविश्वासपूर्ण टोला
Mumbai : मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे राज्य सरकारवर प्रचंड दबाव असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा परिस्थिती हाताळण्याची आपली क्षमता दाखवून दिली. मुंबईत मराठा आंदोलन अवघड जाईल, असा कयास व्यक्त केला जात होता, मात्र फडणवीसांनी संयम आणि कौशल्याने या संकटावर मात केली.
मुंबईत आयोजित कार्यक्रमात मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी फडणवीसांनी मिश्किल भाषेत प्रतिक्रिया देत म्हटलं, “अनेक वेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी भरारी घेतली. राख होण्याचा क्षण आला तेव्हाही मी सकारात्मकतेने पुढे गेलो.”
Crime in Akola : कृषीनगरातील हिंसाचार प्रकरणात १७ जणांवर ‘मोक्का’ कारवाई
ते म्हणाले की, “राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोन गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या. मी आव्हानांपासून कधी पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो. माणसांचा द्वेष केला नाही, टोकाचं राजकारण केलं नाही. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगलं असतं, ते बघण्याचा प्रयत्न मी कायम केला आहे,” असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो आंदोलकांनी मुंबईत ठाण मांडले होते. या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून फडणवीसांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवला आणि आंदोलकांनी माघार घेतली. त्यामुळे ही लढाई हाताळण्यात फडणवीस यशस्वी ठरले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या यशानंतर राज्यातील प्रमुख मराठी, इंग्रजी आणि हिंदी दैनिकांमध्ये तसेच सोशल मीडियावर ‘देवाभाऊ’ या नावाने जाहिरातबाजी करण्यात आली होती. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची प्रतिमा या जाहिरातींतून अधोरेखित करण्यात आल्याचे मानलं जात आहे.
फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना केलेल्या वक्तव्यांतून फडणवीसांनी केवळ आपला आत्मविश्वासच दाखवला नाही, तर राजकीय आव्हानांतून पुन्हा पुन्हा उभं राहण्याची आपली क्षमता अधोरेखित केल्याचं सांगण्यात येत आहे.