Controversy over the foundation ceremony of marriage hall : माजी नगरसेवकांचा आरोप, बेकायदेशीर सोहळा असल्याचा दावा
Mehkar गवळीपुरा भागातील आरक्षित जागेवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी केलेल्या शादीखान्याच्या भूमिपूजनावरून मेहकर राजकारणात मोठे वादंग उसळले आहे. ही जागा टाऊन प्लॅनिंगनुसार भाजीपाला मार्केटसाठी आरक्षित असताना, येथे शादीखान्याचे भूमिपूजन करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप माजी नगरसेवक हनीफ गवळी आणि तौफिक कुरेशी यांनी केला आहे.
त्यांनी सांगितले की, तत्कालीन आमदार संजय रायमूलकर यांच्या प्रयत्नातून शासनाने १४ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार गवळीपुरा भागात शादीखाना बांधकाम व संरक्षण भिंतीसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला होता. नगरपरिषदेकडून यासाठी बालाजी कन्स्ट्रक्शनला कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता. परंतु टाऊन प्लॅनिंग विभागाच्या नकाशानुसार ही जागा अजूनही भाजीपाला मार्केटसाठीच आरक्षित आहे.
यामुळे सदर भूमिपूजन कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य ठरत नसल्याचे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. “आमदार खरात यांनी जर खरंच ही कामे कायदेशीर मंजूर करून आणली असतील तर त्यांनी त्याची अधिकृत कागदपत्रे जनतेसमोर सादर करावीत,” असे आव्हान गवळी व कुरेशी यांनी दिले. तसेच, “नवीन विकासकामे मंजूर करून आणण्याऐवजी आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे नवीन पर्व सुरू झाले आहे. आरक्षित जागेवर प्रत्यक्षात बांधकाम करता येईल का, यावर आता नगरपरिषद आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.