Jigao Project : जिगाव प्रकल्पग्रस्तांचे अर्धनग्न आंदोलन

project-affected people stage a half-nude protest : योग्य मोबदला न मिळाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Buldhana जिगाव प्रकल्पासाठी गेलेल्या जमिनीचा अद्यापही योग्य मोबदला न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे. बुलढाणा शहरातील जिजामाता प्रेक्षागृहाजवळ संविधान आर्मीच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांनी अर्धनग्न आंदोलन छेडले. “शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही जलसमाधी आंदोलन करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, “जिगाव प्रकल्पाचे काम सुरू होऊन तब्बल ३० वर्षे झाली. या काळात प्रकल्पाचा खर्च ३४ हजार कोटींपर्यंत गेला; पण आमच्या सारख्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. जमीन गमावूनही आम्ही भरपाईपासून वंचित आहोत. एवढेच नव्हे तर अतिक्रमित जमिनीबाबत प्रशासनाने दंड वसूल केला, तोही आम्ही भरला. तरीही न्याय मिळालेला नाही.”

Vijayraj Shinde : शेलापूर मेळाव्यातून भाजपचे रणशिंग, तयारीला लागले

यापूर्वी पलसोडा व लगतच्या गावातील शेतकऱ्यांनी दोन वेळा जलसमाधी आंदोलन केले होते. मुंबईतही आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त आता आणखी आक्रमक झाले असून, बुलढाण्यातील आंदोलनात शासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.

संविधान आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “शासनाने या वेळीही मागण्या नाकारल्या, तर पुढचे पाऊल म्हणून जलसमाधी आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही.”

Kisan Congress : पीक विमा थकबाकीसाठी मलकापूरात गोधडी मुक्काम आंदोलन

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची ठाम मागणी म्हणजे जमिनीच्या बदल्यात वाढीव मोबदला मिळावा. “आम्ही विकासासाठी जमीन दिली; पण मोबदला मिळालेला नाही. शासनाने दुर्लक्ष न करता आम्हाला न्याय द्यावा,” असे प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केले.