Electricity thieves on target : महावितरणची धडक मोहीम
अकोला परिमंडळात वीज चोरी विरोधात महावितरणने जोरदार मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत महावितरणकडून विभागानुसार ३० ते ४० पथके तयार करण्यात आली आहेत. पुढील तीन महिन्यांदरम्यान ही पथके सतत कार्यरत राहणार आहेत. मुख्य अभियंता यांनी माहिती दिली आहे की, या मोहिमेदरम्यान थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कार्यकारी संचालक (प्रकल्प) धनंजय औंढेकर यांनी नुकताच व्हिडिओ कॉन्फरेंसच्या माध्यमातून घेतलेल्या आढावा बैठकीत वीज गळती व वीज हानी विरुद्ध नाराजी व्यक्त केली आणि वितरण हानी १५% पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. यामुळे अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात महावितरण अकोला परिमंडळात वीज चोरी विरोधात मोहिम तीव्र करण्यात आली आहे.
या मोहिमेत फॉल्टी मीटर, सरासरी वीज बिल, शुन्य युनिटचे बिल, अत्यल्प वीज वापर अश्या सर्वच ग्राहकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, सवलत देऊनही अभय योजनेत कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले जे ग्राहक सहभागी झालेले नाहीत व त्यांनी पुनर्जोडणी घेतलेली नाही, अश्या कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या सर्वच ग्राहकांच्या प्रत्यक्ष तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे.
वीज जोडणीच्या ठिकाणी अवैधपणे आढळणाऱ्या वीज पुरवठ्याविरुद्ध विद्युत कायदा २००३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. थकबाकी असलेल्या ठिकाणी शेजाऱ्यांकडून अनाधिकृत वीज जोडणी देण्यात आली असेल, तर त्या शेजारी ग्राहकांवरही कायदेशीर कारवाई होणार आहे. वीज चोरीच्या अनधिकृत विद्युतभारामुळे विद्युत वाहकावर, रोहित्रावर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे भार पडतो, परिणामी रोहित्रात बिघाड होतो व शॉर्ट सर्किट होऊन वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.