Protest demanding death penalty for the accused : बुलढाण्यात आक्रोश मोर्चातून जोरदार मागणी
Buldhana जळगाव जिल्ह्यातील मयुरी गौरव ठोसर आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात संताप उसळला असून, या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी बुलढाणा शहर नागरिक समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चातून करण्यात आली. शहरातील संगम चौक येथील शिवस्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन दिले. त्यात नमूद करण्यात आले की, १० सप्टेंबर रोजी जळगाव खांदेशातील सुंदर मोती नगर येथे राहणारी २३ वर्षीय नवविवाहित मयुरी गौरव ठोसर ही सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाली. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांत उच्चशिक्षित तरुणीवर अशी निर्दयी वेळ येणे हे समाजासाठी लज्जास्पद असून, तिची आत्महत्या नसून सासरकडील मंडळींकडून केलेली हत्या असल्याचा ठपका समितीने ठेवला.
Farmers in crisis : अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार; शेतकरी उद्ध्वस्त
या प्रकरणात पती गौरव ठोसर, गणेश किशोर ठोसर, किशोर ठोसर, लता किशोर ठोसर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र सर्व आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा द्यावी, कोणत्याही आरोपीला जामीन मंजूर होऊ नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. तसेच, जिल्हा प्रशासनाने समाजजागृती मोहिम राबवून हुंडाबळी व स्त्रियांच्या छळास आळा घालावा, असेही नमूद करण्यात आले.
या आक्रोश मोर्चात शेकडो बुलढाणेकरांनी सहभाग घेतला होता. विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या स्वाक्षरी असलेल्या निवेदनातून स्त्रीछळाविरोधी कठोर कारवाईची मागणी जोरदारपणे पुढे आली.








