Pombhurna in Chandrapur District Set to Become a Model Taluka in Maharashtra : लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सेवा पंधरवाडा !
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा हा एकेकाळचा मागास तालुका. पण आज या तालुक्याला विकासाचा नवा चेहरा लाभला आहे. उत्कृष्ट रस्ते, नगर परिषदेची इमारत, स्टेडीयम, वाचनालय, इको पार्क, वसतिगृह, सिंचन सुविधा आणि पाणंद रस्त्यांसारख्या कामांमुळे पोंभूर्णा तालुक्याला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यामुळे राज्यात हा तालुका भविष्यात आदर्श तालुका म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवाड्याअंतर्गत पोंभूर्णा येथील लाभार्थ्यांना वर्ग एकचे प्रमाणपत्र वाटप आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, आदिवासी चळवळीचे जिल्हा संघटक प्रमुख जगन येलके, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, तहसीलदार मोहनीश सेलवटकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजीत आमडे, सहाय्यक वनरक्षक आदेश शेंडगे, परीविक्षाधिन तहसीलदार रेखा वाणी, गटविकास अधिकारी नमिता बांगर उपस्थित होते.
लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हा सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. भोगवटदार वर्ग २ मधील प्रलंबित प्रकरणे वर्ग एक मध्ये रुपांतरीत करण्यासाठी थांबलेली होती. ही सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात आली आहेत. पोंभूर्णा येथील सात शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी पुरस्कार मिळवले, ही अभिमानाची बाब आहे. आता जिल्ह्यातील स्टेडीअमचे काम उत्कृष्टपणे केले गेले आहे आणि काही उणिवा राहिल्याही असतील, तर मी स्वतः जातीने त्याकडे लक्ष देईल, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.
Sudhir Mungantiwar : चंद्रपूर जिल्ह्याला मिळणार मुबलक युरीया, मुनगंटीवारांनी दिले निर्देश !
नगरपंचायतीची इमारत, अगरबत्तीचा उद्योग, बंधारे, सीमेंट रस्ते तसेच पाणंद रस्त्यांचे काम येत्या तीन वर्षांत पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यातील युरीया खताची टंचाई मिटवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात १७०० मेट्रीक टन व आज (२५ सप्टेंबर) १६०० मेट्रीक टन युरीया उपलब्ध करून देण्यात आला आहे. या आठवड्यात सात हजार टन युरीया खत आणखी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार मुनगंटीवार यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांनी ‘एक पेड मां के नाम’चे आवाहन केले आहे. त्यामुळे प्रत्येक गावात आणि शेतांच्या बांधावर वृक्ष लागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. मुल येथील सभागृहाप्रमाणेच पोंभूर्णा येथील सभागृहाचेही नुतणीकरण करण्याची घोषणा त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी तालुक्यातील योजनांची कामे पूर्ण करण्याचा संकल्प करावा, असेही आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.