Buldhana Jijau Birthplace Disappointment was also felt in the winter session : हिवाळी अधिवेशनातही पदरी पडली होती निराशा
Buldhana News : राजमाता माँ साहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी बुलडाणा जिल्हा प्रशासनाने ४ मार्च २०२४ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे आराखडा सादर केलेला आहे. २३३.२३ कोटी रुपयांचा हा विकास आराखडा अजूनही मंजूर करण्यात आलेला नाही. हा विकास आराखडा तत्काळ मंजूर करावा, यासाठी राजमाता माँ साहेब जिजाऊ महिला विद्यापीठ निर्मिती समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ सरसावले आहेत.
यांनी निवेदनातून केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांना हे निवेदन त्यांनी दिले आहे. राजमाता माँ साहेब जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेले सिंदखेडराजा हे तमाम मराठीजणांचे प्रेरणास्थळ आहे. या स्थळावरील ऊर्जा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने लोक येतात. या स्थळाच्या विकासासाठी निधी देण्यात सरकारने तत्परता दाखविण्याची गरजही पवळ यांनी व्यक्त केली आहे. विकास आराखड्याचा प्रवासही त्यांनी उलगडला आहे.
या विकास आराखड्याची अनुषंगिक प्रक्रिया मागील वर्षी सुरू झाली. १० जुलै २०२३ रोजी विकास आराखडाविषयक आढावा बैठक तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ४०४.२७ कोटींचा आराखडा पर्यटन विभागास मंजुरीसाठी सादर करण्यात आला. कोअर कमिटीच्या ४ डिसेंबर २०२३च्या बैठकीत ठरल्यानुसार जिजाऊसृष्टी प्रतिष्ठानने ४९.७४ कोटींचा पूरक आराखडा प्रस्तावित केला.
१ जानेवारी २०२४ रोजी पर्यटन व सांस्कृतिक विभागास मंजुरीसाठी हा पूरक आराखडा सादर केला गेला. एकूण ४५४ कोटींचा हा आराखडा सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९ जानेवारी २०२४ रोजी आराखड्याविषयी आढावा बैठकीत सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १५ जानेवारी २०२४ रोजी २५९.५३ कोटींचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला. पुढे सुधारणा करून २३३.२३ कोटी रुपयांचा विकास आराखडा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे ४ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सादर केला.
Appointment of Guardian Minister : पालकमंत्र्यांसाठी प्रदेशाध्यक्षांची ‘तारीख पे तारीख’
ऑगस्ट महिन्यापर्यंत मंजुरीबाबत काहीही हालचाली झाल्या नाहीत. नंतर विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे केले गेले. हिवाळी अधिवेशनात काही तरी होणार ही आशा होती. यातही कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. यावरून जिजाऊप्रेमींमध्ये संताप वाढू लागला आहे. हा विकास आराखडा तत्काळ मंजूर करण्याचे निर्देश पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला देण्याची गरज असल्याचेही पवळ यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले गुरू राजमाता माँ साहेब जिजाऊ होत्या. त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनामनांत आदरभाव आहे. पण, त्यांच्या जन्मस्थळाचा अपेक्षित विकास अजूनही होऊ शकलेला नाही. या विकासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे. शासन आणि प्रशासन अशा दोन्ही पातळ्यांवर विकास आराखड्यासाठी निधीचा अडथळा ठरू नये, म्हणून प्रयत्न करीत राहणार आहे, असे रामेश्वर पवळ यांनी म्हटले आहे.