Major Realignments Among Factions in Buldhana Zilla Parishad Elections : ‘झिरो रोस्टर’चा झटका! बुलढाणा जिल्हा परिषद निवडणुकीत गटांची उलथापालथ
Buldhana जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे राजकीय समीकरणच ‘झिरो रोस्टर’मुळे बदलले आहे. गट व गणांच्या नव्या आरक्षण सोडतीनंतर अनेक तगड्या नेत्यांच्या गोटात खळबळ माजली असून, सुरक्षित गट शोधण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. काहींसाठी ही सोडत धक्का ठरली तर काहींसाठी राजकीय सुवर्णसंधी ठरली आहे.
आरक्षण सोडतीनंतर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ६१ गटांपैकी ३ गट अनुसूचित जमातींसाठी (त्यापैकी दोन महिला), १२ गट अनुसूचित जातींसाठी (५ महिला) आणि १६ गट ओबीसींसाठी (७ महिला) राखीव झाले आहेत. दोन वर्षांपासून आपापल्या गटात मेहनत घेणाऱ्या इच्छुकांच्या राजकीय गणितांवर या आरक्षणाने पाणी फेरले आहे.
नागपूर खंडपीठात ‘झिरो रोस्टर’विरोधात याचिका दाखल करणारे संजय वइतकार यांचा देऊळगाव माळी गट आता अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने त्यांनाही नवा गट शोधावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सुपुत्र ऋषी जाधव यांना पराभूत करून चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या गटात आरक्षणाच्या त्सुनामीने उलथापालथ घडवली आहे.
Rajendra Shingne : शिंगणे म्हणतात, ‘काँग्रेसविषयी शंका, पण महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही’
देऊळघाट गटातून उद्धवसेनेकडील माजी जि.प. सदस्यालाही याच आरक्षणाचा फटका बसला असून, तो गट महिलांसाठी राखीव झाल्याने आता पुरुष इच्छुकांना पत्नी किंवा आईला ‘फ्रंटवर’ आणण्यावाचून पर्याय नाही, अशी स्थिती आहे.
या उलथापालथीत काँग्रेसने मात्र तयारी दाखवली आहे. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की, “काँग्रेसने गटबांधणी आधीच सुरू केली होती, त्यामुळे आरक्षणातील बदल आमच्यावर फारसा परिणाम करणार नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या रूपात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.”
दुसरीकडे भाजपचा प्लॅन गुलदस्त्यात आहे. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी संकेत दिले की, पुढील आठ दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. मात्र, भाजप आंतरिक पातळीवर ‘स्वबळ की महायुती’ या द्विधा मनःस्थितीत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
आरक्षणाचा तपशील
आरक्षण प्रकार एकूण गट महिलांसाठी
अनुसूचित जमाती ३ २
अनुसूचित जाती १२ ५
ओबीसी १६ ७
एकूण ६१ गट व १३ सभापतीपदांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोण्येवार, तहसीलदार संजय बगाडे आदी अधिकारी उपस्थित होते.
सभापतीपदांची नवी समीकरणे
बुलढाणा – अनुसूचित जाती
नांदुरा – अनुसूचित जाती (महिला)
चिखली – अनुसूचित जमाती (महिला)
खामगाव – ओबीसी (महिला)
मेहकर – ओबीसी
शेगाव – ओबीसी (महिला)
लोणार, देऊळगाव राजा, जळगाव जामोद – सर्वसाधारण (महिला)
मलकापूर – ओबीसी
संग्रामपूर – सर्वसाधारण
जिल्हा परिषद अध्यक्षपद या वेळी सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
पुढील आठवडा ठरणार निर्णायक
‘झिरो रोस्टर’मुळे राजकीय समीकरणेच बदलल्याने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नवे खेळ मांडले जात आहेत. काँग्रेसची तयारी मजबूत, भाजप रणनीती आखण्यात गुंतलेला, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) व उद्धवसेना यांच्याकडे गणिते मोजण्याची वेळ आली आहे.
गावोगावात चर्चेचे केंद्र झालेले हे आरक्षणच पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेच्या रणांगणाचे चित्र ठरवणार आहे.