61 Naxalites surrender along with Sonu alias Bhupati : सोनू उर्फ भुपतीने सह 61 नक्षलवाद्यांचे शरणागती
Gadchiroli : नक्षलवादाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि निर्णायक आत्मसमर्पण गडचिरोली जिल्ह्यात घडले आहे. तब्बल 61 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले असून, यामध्ये नक्षलवादी चळवळीतील अत्यंत वरिष्ठ आणि प्रभावशाली सदस्य सोनू उर्फ भुपती याचाही समावेश आहे. या घटनेमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, गडचिरोली परिसरातील नक्षल नेटवर्क कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्राप्त माहितीसाठी माहितीनुसार, आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रमुख नक्षलवादी कॅडरचा समावेश आहे. यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. हे गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठे आत्मसमर्पण मानले जात असून, पोलिस आणि सुरक्षा दलांसाठी ही मोठी कामगिरी ठरली आहे.
Maharashtra Government : आर्थिक स्थैर्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
सोनू उर्फ भुपती याचे मूळ नाव मल्लोजुला वेणुगोपाल राव असून, तो नक्षलवादी (माओवादी) पक्षाच्या पोलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा वरिष्ठ सदस्य आहे. 69 वर्षीय भुपती बीकॉम पदवीधर असून, गेल्या चार दशकांपासून नक्षलवादी संघटनेत सक्रिय होता. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील अनेक नक्षल कारवायांची जबाबदारी होती. त्याच्यावर जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते.
भुपती महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती माड डिव्हिजनमध्ये सक्रिय होता. माजी महासचिव बसवराजू यांच्या मृत्यूनंतर तो पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी एक संभाव्य दावेदार मानला जात होता. त्याचा धाकटा भाऊ किशनजी (मल्लोजुला कोटेश्वर राव) 2011 मध्ये कोलकात्याजवळ झालेल्या चकमकीत ठार झाला होता. विशेष म्हणजे, भुपतीची पत्नी तारक्का हिने गेल्या वर्षीच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते आणि सध्या ती पुनर्वसन शिबिरात राहत आहे. काही दिवसांपूर्वीच भुपतीने केंद्र सरकारला शांतता चर्चेसाठी आणि तात्पुरत्या शस्त्रसंधीसाठी पत्र लिहिले होते, त्यामुळे त्याच्या आत्मसमर्पणाने नव्या घडामोडींना वेग आला आहे.
Devendra Fadanvis : मुख्यमंत्र्यांनी ‘त्या’ चर्चांना दिला विराम !
गडचिरोली पोलिसांकडून सध्या या आत्मसमर्पण केलेल्या सर्व माओवाद्यांवर किती गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर किती बक्षीस जाहीर होते, याची सविस्तर माहिती घेतली जात आहे. या आत्मसमर्पणामुळे गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या संघटनात्मक रचनेवर आणि त्यांच्या कारवायांवर मोठा परिणाम होणार आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तसेच गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नक्षलवाद्यांची पकड कमकुवत झाली असून, या आत्मसमर्पणाने नक्षल चळवळीचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
____