NCP Sharad Pawar : बुलढाण्यात शरद पवार गटाला धक्का! जिल्हाध्यक्षाच्या राजीनाम्याने खळबळ

District President Rekha Khedekar Resigns : निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणात उलथापालथ

Chikhli स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार रेखा खेडेकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी आमदार रेखा खेडेकर या पक्षफुटीनंतर शरद पवार यांच्या गटासोबत ठाम उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत पक्षसंघटन पुन्हा उभारण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, निवडणुकीच्या अगदी तोंडावर त्यांनी दिलेला हा राजीनामा पक्षासाठी राजकीय धक्का आणि अंतर्गत अस्वस्थतेचे द्योतक ठरत आहे.

Fake birth certificate : मलकापुरात ७१७ बोगस जन्मदाखले कायमस्वरूपी रद्द!

खेडेकर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पत्राद्वारे सादर केला असून, त्यात त्यांनी — “मी बुलढाणा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने देत आहे. कृपया तत्काळ स्वीकारावा,” अशी विनंती केली आहे.
तथापि, त्यांनी राजीनाम्याचे सविस्तर कारण किंवा पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे “रेखाताई आता कुठे?” हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काहींच्या मते, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि संघटनात्मक अडचणींमुळे हा निर्णय घ्यावा लागला असावा, तर काहींच्या मते हा राजकीय पुनर्स्थापनेचा इशारा असू शकतो.
एकंदरीत, बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समीकरण आता नव्या घडामोडींकडे वळताना दिसत आहे.