Election formula for local body election decided : स्थानिक स्वराज्य साठीचा निवडणूक फॉर्म्युला ठरला
Mumbai : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीची रणनीती निश्चित करण्यात आली आहे. भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निवडणूक फॉर्म्युला ठरवला आहे. त्यानुसार, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढवणार असून, उर्वरित महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील. निवडणुकीनंतर मात्र हे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊन सत्तास्थापन करतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
महायुतीच्या या निर्णयानंतर स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे. महायुतीतील पक्ष स्वतंत्र लढल्यास मतांचे विभाजन होऊन विरोधक विशेषतः महाविकास आघाडी यांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना संकेत दिले की, “मुंबईत महायुती एकत्र लढेल. रणनीती स्पष्ट आहे जिथे विरोधक मजबूत आहेत, तिथे आम्ही एकजुटीने लढू.”
देशातील सर्वाधिक महसूल असणारी मुंबई महानगरपालिका ही सर्व पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढत मानली जाते. विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणे तापली आहेत. ठाकरे बंधूंची ही संभाव्य आघाडी महायुतीसमोर आव्हान ठरू शकते, आणि त्यामुळेच मुंबईत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
Local Body Elections : जिल्हा परिषदेसाठी रंगणार जोरदार सामना
दरम्यान, इतर ठिकाणी विशेषतः ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये स्थानिक राजकीय परिस्थिती वेगळी असल्याने तिन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पाहता, 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप वेगळे लढले होते. त्यावेळी शिवसेनेने 67 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं होतं, तर भाजपला फक्त 23 जागा मिळाल्या होत्या. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्या शिंदे गटाकडे 85 माजी नगरसेवक आहेत, ज्यांनी विविध पक्षांमधून प्रवेश केला आहे. दुसरीकडे भाजपकडे अजूनही 23 नगरसेवकांची ताकद आहे. त्यामुळे ठाण्यात शिंदे गट आणि भाजप वेगळे लढल्यास थेट मतांची विभागणी होण्याची शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.
Damage to Farmland Due to Waterlogging : नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी चढले टॉवरवर!
भाजपचे आमदार संजय केळकर आणि गणेश नाईक हे ठाण्यात शिंदे गटाविरुद्ध सक्रिय असल्याचे दिसते. अशा पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, महाविकास आघाडी एकत्र लढल्यास या विभागणीतून त्यांना थेट लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे जाणकारांचे मत आहे .
_____