Funds for MLA : सत्ताधाऱ्यांच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींची ‘खिरापत’

Rohit Pawars attack on the mahayuti government : रोहित पवारांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Mumbai: राज्यातील महायुती सरकारने केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधीचे वाटप केल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार करत, या निधीवाटपाला “मतांची खरेदी” असे संबोधले आहे.

रोहित पवार यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, “मध्यमवर्गीय मराठी कंत्राटदारांचे तब्बल 80 हजार कोटी रुपये सरकारकडे थकलेले आहेत. ते देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण केवळ सत्ताधारी पक्षाच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यासाठी मात्र निधी उपलब्ध आहे. विकासनिधीच्या नावाखाली सरकारी तिजोरीतील पैशातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतांची खरेदी करण्याचा हा राजकीय जुगाड आहे. ही केवळ लोकशाहीची थट्टा नाही, तर लोकशाहीला गालबोट लावणारी कृती आहे.”

Local body Election : मुंबईत महायुती एकत्र, उर्वरित ठिकाणी स्वतंत्र लढवणार

पुढे ते म्हणाले, “खोक्यातून जन्म घेतलेल्या सरकारकडून समान न्यायाची अपेक्षा करणे म्हणजे गुंडांकडून सद्वर्तनाचं प्रवचन ऐकण्यासारखं आहे.” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर रोखठोक प्रहार केला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनीही महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. “सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुजाभाव न करण्याची शपथ घेतात. मात्र, ज्या भागात सत्ताधारी आमदार नाहीत, त्या ठिकाणी निधी न देण्याचा निर्णय म्हणजे त्या शपथेचा हरताळ फासण्यासारखं आहे,” अशी टीका त्यांनी केली.

Maharashtra politics : निधी थांबवून शपथेलाच हरताळ फासला

ते पुढे म्हणाले, “राज्यात शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत विकासनिधीच्या आमिषाने मतं मिळणार नाहीत. जनता आता सत्ताधाऱ्यांच्या खोट्या आश्वासनांना आणि पक्षपाती धोरणांना कंटाळली आहे.”

राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असताना, या निधीवाटपाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात शब्दयुद्ध अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

____