Voter List Segregation Work in the Final Stage : अकोला महापालिका निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
Akola अकोला महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, मतदार यादी विभाजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात प्रारूप मतदार यादी तयार करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत निवडणुकीशी संबंधित कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.
Local Body Elections : मतदारयादीत सुधारणा झाल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही
आयोगाने २१ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जुलै २०२५ ही ‘कट-ऑफ डेट’ म्हणून निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ही महापालिका क्षेत्रातील प्रभागनिहाय विभागून प्रारूप मतदार यादी म्हणून वापरण्यात येणार आहे. ही प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत वेळेचे बंधन लक्षात घेऊन काम अचूक, पारदर्शक आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. सुनील लहाने यांनी दिल्या आहेत. त्यांच्या आदेशानुसार विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रियेतील सर्व टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत मतदार यादीचे विभाजन, तपासणी, अद्ययावत नोंदी, इलेक्ट्रॉनिक डेटा व्यवस्थापन, जीआयएस मॅपिंग आणि केंद्रनिहाय क्रमांकन यांसारख्या बाबींचा आढावा घेण्यात आला.








