Direct response from Chief Minister Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची थेट प्रतिक्रिया
Phaltan : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका तरुण महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांना अटक केली असून, दोघांनाही निलंबित करण्यात आलं आहे. या आत्महत्येच्या प्रकरणावरून खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर आरोप करण्यात आले, आणि यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर असताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “परवा आमची एक लहान बहिण, जी डॉक्टर होती, तिचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केली. या घटनेचं संपूर्ण सत्य लवकरच बाहेर येईल. आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा आमचा निर्धार आहे.”
Voter list correction : देशभरात मतदारयाद्या सुधारणा कार्यक्रमाला सुरुवात
त्यांनी पुढे राजकीय आरोपांवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. “अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं, ही अतिशय निंदनीय प्रवृत्ती आहे. काहीही कारण नसताना रणजित दादा आणि सचिन दादाचं नाव यात ओढण्याचा प्रयत्न झाला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहेत. जर किंचितशीसुद्धा शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करून इथे आलो नसतो,” असं फडणवीस म्हणाले.
Loan waiver : कर्जमाफीचा मुहूर्त काढायला यूपीमधून बामन आणून देतो
ते पुढे म्हणाले, “अशा संवेदनशील विषयांमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही आणि राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा प्रश्न आहे, तिथे मी कोणतीच तडजोड करत नाही. पण जर कोणी प्रेताच्या टाळूवरचं लोणी खात असेल आणि या प्रकरणावर राजकारण करत असेल, तर ते मी सहन करणार नाही. त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी स्वतः आहे, हे लक्षात ठेवा.”
मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याने राजकीय चर्चांना नवं वळण मिळालं आहे. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण तापलं असतानाच, फडणवीसांच्या या वक्तव्यानं विरोधकांवर स्पष्ट संदेश दिल्याचं मानलं जात आहे.
_____








