Local Bode Elections : नेत्यांच्या सौभाग्यवतींना झेडपी अध्यक्षपदाचे वेध!

Leaders’ Wives Eyeing ZP President Post : अमरावती जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण महिला आरक्षणामुळे राजकीय समीकरणे बदलली

Amravati अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण यंदा सर्वसाधारण महिलांसाठी जाहीर झाले असून, त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. झेडपीचे राजकारण मुठीत ठेवणाऱ्या अनेक दिग्गज नेत्यांनी आता “मी नाही तर माझी ती” असा राजकीय डाव आखला आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत अनेक नेत्यांच्या सौभाग्यवती रणांगणात उतरतील, अशी चर्चाच जिल्ह्यात रंगली आहे.

दिवाळीनंतरच्या मिलन कार्यक्रमांत आणि भेटीगाठींत अनेक नेत्यांसोबत त्यांच्या पत्नी आवर्जून दिसू लागल्याने या चर्चेला अधिक उधाण आले आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठीची आचारसंहिता नोव्हेंबरमध्ये लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यापूर्वीच झेडपी अध्यक्षपदाच्या आरक्षणाने स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Local Bode Elections : बुलढाण्यातील नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘हायप्रोफाईल’!

अनेक गटांचे आरक्षण ओबीसी, एससी आणि एसटी महिलांसाठी असल्यामुळे प्रस्थापित पुरुष नेत्यांना स्वतःच्या गटात निवडणूक लढविणे राजकीयदृष्ट्या कठीण ठरत आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या सौभाग्यवतींमार्फत राजकीय पकड कायम ठेवण्याची रणनीती आखली आहे. परिणामी, जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय दिग्गजांच्या पत्नींची ‘जोर आजमाईश’ पाहायला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर तिवसा, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, अचलपूर, चिखलदरा आणि धामणगाव रेल्वे या तालुक्यांतील अनेक गट राजकीय दृष्ट्या हॉटस्पॉट ठरणार आहेत. वलगाव, तळेगाव ठाकूर, हिवरखेड, खोलापूर, वाढोणा रामनाथ, चिंचोली, सिंधी, खल्लार, आसेगाव पूर्णा, धामणगाव गढी, लोणी, जुना धामणगाव, मंगरूळ दस्तगीर आणि थिलोरी या गटांत नेत्यांच्या सौभाग्यवतींकडून उमेदवारीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Local Body Elections : आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला!

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवूनच अनेक नेत्यांनी सौभाग्यवतींसह ग्रामपातळीवरील संपर्क मोहिमा सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत गावागावांत सौभाग्यवतींसाठी मतांचा ‘जोगवा’ मागणारे दिग्गज दिसतील, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू आहे.

झेडपी सदस्यसंख्येवर एक नजर :

एकूण सदस्यसंख्या : ५९

महिला राखीव गट : ३०

पुरुष गट : २९

अनुसूचित जमाती : १२ (६ महिला, ६ पुरुष)

अनुसूचित जाती : ११ (६ महिला, ५ पुरुष)

ओबीसी : १५ (८ महिला, ७ पुरुष)

सर्वसाधारण : २१ (१० महिला, ११ पुरुष)