New CJI : भारताचे ५३ वे सरन्यायाधीश होणार न्यायमूर्ती सूर्यकांत

Chief Justice Bhushan Gavai recommended as successor : सरन्यायाधीश भूषण गवई यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस

New Delhi : सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची औपचारिक शिफारस केली आहे. नोव्हेंबर महिन्यात सरन्यायाधीश गवई निवृत्त होणार असून, त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. ते ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत या पदावर कार्यरत राहतील.

सुप्रीम कोर्टातील परंपरेनुसार, निवृत्त होणारे सरन्यायाधीश आपल्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केंद्र सरकारला करतात. याच पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी सरकारने सरन्यायाधीश गवई यांना शिफारसीसाठी पत्र लिहिले होते. त्यानुसार, गवई यांनी संबंधित शिफारसपत्र पाठवून त्याची प्रत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनाही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Doctor suicide case : फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणात धक्कादायक वळण

न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म १० फेब्रुवारी १९६२ रोजी हरियाणातील हिसार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी १९८१ साली हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी, तर १९८४ साली रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी हिसार जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली आणि आपल्या अभ्यासू दृष्टिकोनामुळे लवकरच नाव कमावले.

९ जानेवारी २००४ रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे ५ ऑक्टोबर २०१८ रोजी त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारला. २४ मे २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात बढती झाली. १२ नोव्हेंबर २०२४ पासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत.

Farmer leaders together : नागपुरात उद्या बच्चू कडुंचा महाएल्गार !

सुमारे दोन दशकांच्या न्यायिक कारकिर्दीत, न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कलम ३७० रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्यांचे रक्षण, भ्रष्टाचारविरोधी कारवाई, पर्यावरण संरक्षण, आणि लिंग समानता यांसारख्या विषयांवर अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. त्यांच्या न्यायशैलीत स्पष्टता, संविधाननिष्ठता आणि मानवी मूल्यांप्रती बांधिलकी जाणवते.

सर्वोच्च न्यायालयाच्या नेतृत्वाचा पुढील टप्पा म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नियुक्तीकडे देशभरातील विधिज्ञ आणि न्यायक्षेत्र उत्सुकतेने पाहत आहेत. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाकडून संविधानिक तत्त्वांना आणि जनहिताला बळ देणाऱ्या न्यायनिर्णयांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

_____