A few days ago, there was a robbery at Minister Raksha Khadses petrol pump. : काही दिवसांपूर्वीच मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा
Jalgaon : शहरातील शिवरामनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जळगाव शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता, आणि आता काहीच दिवसांत खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याने पोलिस यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खडसे यांच्या बंगल्यातून सहा ते सात तोळे सोने आणि 35 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, या चोऱ्येमागील आरोपींचा शोध सुरू आहे.
Doctor suicide case : मृत्यूनंतरही फिंगर लॉक वापरून पुरावे डिलीट?
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांचा जळगावातील बंगला काही दिवसांपासून बंद होता. सकाळी नियमित पाहणीसाठी कर्मचाऱ्याने बंगल्याकडे गेल्यावर त्याने घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचे पाहिले. त्याने तत्काळ खडसे यांना कळवले आणि खडसे यांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे.
घटनेबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे म्हणाले की, “रात्री घरफोडी झाली आहे. बंगल्यातील सर्व रूमची कुलुपं तोडून चोरी केली आहे. माझ्या रूममधील 35 हजार रुपये आणि चार अंगठ्या चोरीला गेल्या आहेत. खाली राहत असलेल्या आमच्या नातेवाईकांचेही सुमारे पाच तोळे सोनं चोरीला गेलं आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली आहे.”
यासोबतच खडसे यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. “जळगाव जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही. चोऱ्या, दरोडे आणि दोन नंबरचे धंदे वाढले आहेत. पोलिसांवर टीका केली की स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात. घटनेचं गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही,” अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी 9 ऑक्टोबरच्या रात्री मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडे पडले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या ‘रक्षा फ्युअल’सह कर्की फाट्यावरील ‘मनुभाई आशीर्वाद’ आणि तळवेल फाट्यावरील ‘सय्यद पेट्रोल पंप’ यांचा समावेश होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत एकूण सुमारे 1 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून नाशिक आणि अकोला जिल्ह्यात छापे टाकले होते.
या दोन्ही घटनांमुळे जळगाव जिल्ह्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणांच्या तपासात तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.








