Mahayuti’s Counterattack on Bachchu Kadu’s Maha Elgar Agitation : राज्यमंत्री पंकज भोयर यांचा दावा, सरकार सक्षम, जनतेचा कल महायुतीकडेच”;
Nagpur : राज्याच्या राजकारणात सध्या तापलेले वातावरण आणखी चढले आहे. जैन बोर्डिंग प्रकरणावर राज्यमंत्री पंकज भोयर यांनी जैन बोर्डिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दोषींवर चौकशी करून कारवाई होईल, अशी हमी दिली. मात्र पुरावे नसताना आरोप करणे योग्य नाही, असे सांगून त्यांनी प्रशासनाची बाजूही सांभाळून धरली.
या वक्तव्याने सरकारने सेफ प्ले करत प्रकरणावर थोडं सावध पाऊल टाकल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे, माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात होणाऱ्या ‘महाएल्गार आंदोलनावर भाजप-शिंदे सरकारकडून पलटवार झाला आहे. भोयर म्हणाले, सत्तेबाहेर असलेले लोक आंदोलनांच्या माध्यमातून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. पण जनतेला ठाऊक आहे की विकासाचं काम महायुतीच करत आहे. त्यामुळे लोकांचा कल कुणाकडे जाणार नाही.
त्यांच्या या विधानावरून विरोधकांच्या टोळ्या सत्तेच्या संवेदनशीलतेवर वार करत आहेत, तर सत्ताधाऱ्यांनी जनतेवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
Crime News : माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या घरात चोरी; सोनं आणि रोकड लंपास
आमची भूमिका ठरलेली आहे. कोणालाही शंका असल्यास चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही खुले आहोत, असं म्हणत भोयर यांनी विरोधकांना संवादाचं निमंत्रण देत आपली राजनैतिक लवचिकता दाखवली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी स्पष्ट केलं की निर्णय स्थानिक नेतृत्वाच्या सल्ल्याने, स्थानिक पातळीवरच घेतला जाईल. यामागे स्थानिक स्तरावरची नाराजी कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतो.
दरम्यान, वाढत्या महिला अत्याचारांवर विचारलं असता भोयर यांनी गृह विभाग आणि पोलिस विभाग सक्षमपणे काम करत आहेत. निर्भीडपणे लोक समोर येत आहेत, असं सांगितलं. मात्र फक्त आश्वासनं की ठोस कृती, विरोधकांचा हा सवाल कायम आहे
राज्यातील आंदोलन, तपास, आणि निवडणुकांचे गणित या तिन्ही आघाड्यांवर महायुती आता बचावात्मक पण रणनीतीपूर्ण मोडमध्ये गेली आहे. बच्चू कडूंच्या महाएल्गारमुळे सरकारवर दबाव निर्माण झाला असला, तरी सत्ताधाऱ्यांनी दिलेली प्रत्युत्तरे सांगतात की लढा अजून संपलेला नाही, फक्त रणनिती बदलली आहे.








