Local Body Elections : दर्यापूरात काँग्रेसचा उमेदवार ठरला! मंदाकिनी भारसाकळे रिंगणात

Congress Candidate Finalized in Daryapur : नगराध्यक्षपदावर नशीब आजमावणार, इतर नगरपरिषदांबाबत काँग्रेस सावध भूमिकेत

Amravati दर्यापूर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत नगराध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सर्वप्रथम उमेदवार निश्चित करत आघाडी घेतली असून, सौ. मंदाकिनी सुधाकर पाटील भारसाकळे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राहणार असल्याचे काँग्रेस वर्तुळातून समजते. दर्यापूर नगरपालिकेसाठी उमेदवार निश्चित झाला असला तरी जिल्ह्यातील इतर नगरपालिकेबाबत मात्र काँग्रेस सावध भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे.

दर्यापूर नगरपरिषदेसाठी ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांच्या पत्नी सौ. मंदाकिनीताई भारसाकळे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

पक्षश्रेष्ठींनी मंदाकिनीताई यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असून, प्राथमिक स्तरावर मतदार संपर्क व भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतल्याने काँग्रेस शिबिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Local Body Elections : अमरावती महापालिका निवडणुका जानेवारीत?

मागील निवडणुकीत सुधाकर पाटील यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता, मात्र या वेळी त्या पराभवाची भरपाई करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. सहकार क्षेत्रात पाटील यांचे योगदान व प्रभाव लक्षात घेता, दर्यापूर शहरात भारसाकळे कुटुंबाची मजबूत पकड असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मंदाकिनीताई भारसाकळे यांनी तत्परता दाखवली असून, समाजातील विविध घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचे संकेत आहेत. काँग्रेसकडे सक्षम नेतृत्व असल्याने दर्यापूर नगरपरिषद काँग्रेसच्या ताब्यात जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

Local Body Elections : काँग्रेसचा गड फोडण्याची भाजपची तयारी!

“गेल्या अनेक वर्षांपासून दर्यापूर शहरातील समस्या प्रलंबितच आहेत. पालिका प्रशासनात सक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. ही मरगळ दूर करण्यासाठी दर्यापूरला सशक्त व जबाबदार नेतृत्व म्हणून सौ. मंदाकिनीताई भारसाकळे यांच्यापेक्षा योग्य व्यक्ती नाही, असे नागरिकांचे एकमुखी मत आहे,” असं खासदार बळवंत वानखेडे म्हणाले.